मालिका, चित्रपट, नाटकातील बारकावे शिकणे आवश्यक – भडकमकर

देवरूख : मालिका, चित्रपट, नाटकाच्या क्षेत्रातील कोणतीही कला आत्मसात करावयाची झाल्यास या माध्यमांमधील बारकावे आत्मसात केले पाहिजेत, असे प्रतिपादन अभिनेते, दिग्दर्शक, चित्रपट पटकथा लेखक, नाटककार आणि साहित्यिक कलावंत अभिराम भडकमकर यांनी केले.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालय भाषा विभाग आणि डॉ. तात्यासाहेब नातू कला, वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने मालिका, चित्रपट, नाटक, पटकथा लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयकौशल्य या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन आणि ऑफलाइन राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. नाटककार आणि कवी श्रीपाद जोशी यांचेही मार्गदर्शन या चर्चासत्रासाठी लाभले.

चर्चासत्राच्या प्रथम सत्रात बोलताना श्री. भडकमकर यांनी चित्रपट, नाटक, मालिका लेखनाचे तंत्र कसे वेगळे असते, हे सांगितले. तसेच या क्षेत्रात त्यांनी घेतलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. संहिता लेखकाला कोणत्याही विषयावर लेखन करायचे असेल तरी त्याला आपल्या रूढी, परंपरा आणि समाज व्यवहार यांचे संपूर्ण भान असावे लागते, वाचन किती संपृक्त असावे लागते याबद्दल मार्गदर्शन केले. माणूस नावाचे तंत्र समजून घेण्यासाठी खूप वाचन करणे गरजेचे आहे. पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत याचबरोबर पाश्चात्य कथा, नाटके वाचली पाहिजेत, चित्रपट पाहिले पाहिजेत आणि कोणतीही भूमिका मिळाली तरी संपूर्णपणे झोकून देऊन काम करता यायला हवे. तरच या क्षेत्रात आपली कलावंत म्हणून ओळख निर्माण करता येईल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दुसऱ्या सत्रामध्ये श्रीपाद जोशी यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी येणारी नाटके कशा स्वरूपाची असतात, पारितोषिकप्राप्त नाटकांचे नेमके यश कोणत्या गोष्टीत असते, ते विशद केले. नाट्यक्षेत्रात पदार्पण करायचे असेल तर युवकांनी आपली ऊर्जा त्यासाठी वापरली पाहिजे. मनातले न्यूनगंड, संकोच बाजूला सारून अभिनय करताना आपले शंभर टक्के प्रयत्न करता आले पाहिजेत. कलावंतालाही रियाज करावा लागतो. तो कशा प्रकारे केला पाहिजे, याबद्दलचे तंत्र त्यांनी विशद केले.

भाषेच्या विद्यार्थ्यांना दृक् श्राव्य माध्यमांची ताकद कळावी, या माध्यमांचे कौशल्य आत्मसात केल्यास उद्योग-व्यवसायाच्या कोणत्या संधी प्राप्त होतात हे कळावे, कला आणि साहित्य यांच्या संस्कारात घडताना एक संवेदनाशील आणि अभिरुचीसंपन्न माणूस म्हणून, कलावंत म्हणून घडण्यासाठी कोणते परिश्रम घ्यावे लागतात, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे हा चर्चासत्राचा उद्देश चर्चासत्राच्या प्रास्ताविकात मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा फाटक यांनी विशद केला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी या चर्चासत्राच्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा करून घ्यावा आणि स्वतःची कलावंत म्हणून ओळख घडवावी, असे मत व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडुलकर यांनी चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित केले गेलेले हे चर्चासत्र भाषेच्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने भाषेची ताकद समजून घेण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. उपप्राचार्य डॉक्टर सरदार पाटील यांनी सांगितले की, भाषा विभागाने आयोजित केलेल्या या चर्चासत्राचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्यातील रंगमंचीय कौशल्य विकसित करावीत.

हिंदी विभाग प्रमुख प्रा. पुजारी मॅडम यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. प्रा. अजित जाधव यांनी आभार मानले. चर्चासत्राला देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह शिरीष फाटक, उपाध्यक्ष कुमार भोसले उपस्थित होते. चर्चासत्रामध्ये ३०९ विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा दिवाकर पाटणकर, प्रा.अजिंक्य नाफडे, प्रा. विकास शृंगारे यांचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply