कोल्हापूर : पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ इत्यादी सर्वांनीच कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कणेरी मठातील सिद्धगिरी आश्रमाने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. त्याचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते आज, २० फेब्रुवारी रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. हा लोकोत्सव येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
श्री. शिंदे म्हणाले, आपला देश कृषीप्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करतो. याच्या मुळाशी पर्यावरणाचे रक्षण हाच हेतू आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्नही आहेत. यापुढील काळात आपल्याला सेंद्रिय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरण उपक्रमास प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. विकास करताना तो पर्यावरणपूरक असाच करावा लागेल. या लोकोत्सवाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती वाढवून ती राज्यव्यापी करावी लागेल आणि ती लोकचळवळ बनवावी लागेल.
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेल्या ‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पंचतत्त्वांचे सृष्टीसाठीचे महत्त्व, त्यांच्यावर होत असलेले अपायकारक परिणाम, पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी मानवी जीवनशैलीत अपेक्षित असलेल्या बदलांचा संदेश या प्रयोगातून देण्यात आला.
तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मानवी जीवनाशी निगडित असलेल्या पंचमहाभूतांच्या सजग जाणिवेसह त्यांच्या होत असलेल्या प्रदूषणाविषयी व्यापक जनजागृती आणि सामूहिक प्रयत्न यांची अनुकरणीय कार्यपद्धती या लोकोत्सवातील विविध विषयांवरील विचारमंथनातून नक्कीच विकसित होईल.
प्रारंभी स्वागत करताना सिद्धगिरी कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, समाजातील विविध संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी मिळून आपले सामूहिक दायित्व म्हणून मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेल्या पंचमहाभूतांच्या प्रदूषणाला आवर घालण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. उद्याचे नागरिक असणार्या शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचा प्रारंभ या लोकोत्सवातून होईल, असा विश्वास वाटतो. अवघा समाज भौतिक प्रगती वेगाने करत असताना वेड्यांची रुग्णालये वाढणे आणि मानसोपचारतज्ज्ञांची संख्या वाढणे चिंताजनक आहे. त्याचे उत्तर या लोकोत्सवाच्या मंथनातून मिळेल.
यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजींनी पंचमहाभूत संरक्षणाची शपथ उपस्थितांना दिली.
समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, दैनिक पुढारीचे योगेश जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.








