अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक : काडसिद्धेश्वर स्वामी

कोल्हापूर : पूर्वीच्या काळी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा विविध कामांसाठी वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.

कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात राष्ट्रीय पारंपरिक वैद्य संमेलनात ते आज बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक गावात किंवा १० गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यवन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुजरातमध्ये पारंपरिक वैद्यांचे स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात वैद्यांसाठी विद्यापीठ निर्माण व्हायला हवे. एकमेकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, विविध उपचार पद्धतींची देवाण-घेवाण व्हावी, हा या संमेलनाचा उद्देश आहे. वैद्यांचे संघटन होणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध भागांत वैद्यांच्या निर्माणासाठी शिबिरांचे आयोजन करायला हवे. मानवजातीतील ८० टक्के रोग पारंपरिक वैद्य बरे करू शकतात. त्यासाठी मोठ्या रुग्णालयांची आवश्यकता नसते. केवळ २० टक्के रुग्णांसाठीच रुग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामवैद्य असणे आवश्यक आहे.

यावेळी कर्नाटकचे शंकरवृद्धा स्वामीजी, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष एच. आर. गायकवाड, कर्नाटक आयुषचे माजी संचालक जी. एन. श्रीकांतय्या, पारंपरिक वैद्य परिषदेचे अध्यक्ष जी. महादेवय्या, केरळ येथील वैद्य महासभेचे अध्यक्ष मन्नार जी. राधाकृष्णन वड्यार, वरिष्ठ शास्त्रज्ञ मनीष बोरवालिया यांच्यासह देशभरातील विविध आयुर्वेदिक वैद्य उपस्थित होते.

यावेळी भारतातील विविध राज्यातून आलेल्या पांरपारिक वैधा च्या उपचार पद्धती च्या माहिती चे संकलन लिखित व चित्रफिती रुपात करण्याचेही एकमताने ठरविण्यात आले.

भारतीय संस्कृती इतर देशांपेक्षा वेगळी : आसिफ खान
भारतीय संस्कृती इतर देशांपेक्षा वेगळी आहे. त्यामध्ये पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे मत केरळचे राज्यपाल आसिफ खान यांनी व्यक्त केले. लोकोत्सवातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जीवन जगताना एकटे जगणे अवघड आहे. हेच एकत्र जगलो तर खूप सोपे जाते. निसर्गाचेसुद्धा असेच आहे. पृथ्वीसुद्धा पंचमहाभूतांनी बनली आहे. त्यामध्ये पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू हे सुरक्षित राहिले पाहिजेत. तरच आपण पुढील आयुष्य सुरक्षित जगू शकू. मनुष्याला एकटे जीवन जगणे कठीण असून सर्वांनी सामुदायिक जगले पाहिजे. समूहाची ताकद एकटे राहण्यापेक्षा खूप मोठी असते. देशहितासाठी आणि देशरक्षणासाठी प्रदूषणमुक्तीसाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. याची सुरुवात कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी चालू केली असून ही मालिका संपूर्ण देशभर गाजेल. आपल्या हितासाठी आता सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दिव्यता आहे. स्त्री अथवा पुरुष त्या सर्वांना दिव्यता आणि आत्मा एकच आहे. मनुष्यप्रमाणेच झाडे, पक्षी, किडे यांच्यामध्येसुद्धा आत्मा असून त्यांचेसुद्धा रक्षण झाले पाहिजे.

यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार महेश शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply