देवरूख : देवरूख येथील शहीद जवान स्मारकस्थळी एचपीटी-३२ लढाऊ विमानाचे अनावरण समारंभपूर्वक करण्यात आले.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून एचपीटी-३२ लढाऊ विमान मिळाले आहे. शहीद जवान स्मारक आणि परमवीर चक्र दालनाच्या ठिकाणी आनंददायी वातावरणात या विमानाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला माजी सैनिक पद्मश्री गजाननराव माने, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत (एव्हीएसएम, पीव्हीएसएम) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात शहीद जवान स्मारक स्थळाला अभिवादन करून मान्यवरांनी केली. अनावरणानंतरचा कार्यक्रम माटे-भोजने सभागृहात झाला. संस्था कार्यवाह शिरीष फाटक यांनी प्रास्ताविक केले. शहीद जवान स्मारकासारख्या वास्तूंची शैक्षणिक आस्थापनांमध्ये असणारी गरज आणि महत्त्व त्यांनी विशद केले. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी शाल, श्रीफळ व शहीद स्मारक स्मृतिचिन्ह देऊन पद्मश्री गजाननराव माने आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांचा सत्कार केला.
श्री. माने यांनी सांगितले की, नौदलाच्या ३२ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर डोंबिवली येथे कुष्ठ रुग्णांसाठी दवाखाना सुरू करून समाजकार्याची सुरुवात केली. या रुग्णांना स्वयंरोजगार प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. यातून शिवणकाम, मेणबत्ती, इमिटेशन ज्वेलरी बनविण्याच्या छोट्या उद्योगातून रोजगार उपलब्ध केला. जपानमधील सासाकावा लेप्रसी फाउंडेशनने या कार्याची दखल घेऊन आर्थिक साह्य केले. त्यातून पर्यावरणपूरक बायोगॅस प्रकल्प आणि स्वयंरोजगारावर आधारित प्रकल्प उभे राहिले. युवकांनी अधिकाधिक प्रमाणात सैन्यामध्ये भरती होऊन भारतमातेची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले. एअर मार्शल हेमंत भागवत यांनी आपल्या मनोगतात सैन्यात उपलब्ध झालेल्या नवीन संधी, युवा पिढीने सैन्यामध्ये भरती होण्यासाठी काय करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली.
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत म्हणाले की, माजी सैनिकांनी समाजकारणात व राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन देशाच्या प्रगती व विकासाला हातभार लावावा.
कार्यक्रमाला माजी सैनिक चंद्रकांत चाळके, अमर चाळके, सुभाष मोरे, सुरेंद्र भोंदे, सूर्यकांत पवार, विजय पवार, संस्था विश्वस्त भास्कर शहाणे, अशोक मोहिरे, संस्था उपाध्यक्ष व शहीद जवान स्मारक अध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, बबन बांडागळे, सुरेंद्र गीते, रमेश सप्रे, संगमेश्वर तालुक्यातील माजी सैनिक, संस्था पदाधिकारी, देशप्रेमी नागरिक, संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी केले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

