दापोली : देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्त्व प्राप्त होणार असून येणाऱ्या काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा एकेचाळिसावा पदवीदान समारंभ आज दापोली येथे विद्यापीठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य आणि देशाच्या समृद्धीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे श्री. बैस म्हणाले. भावी पिढ्यांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्त्व अनन्यसाधारण राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
इंफाळ येथील केंद्रीय कृषी विश्वविद्यालयाचे कुलपती आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ. एस. अय्यपन यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरलेला आहे. यापुढील काळात तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे.
विद्यापीठाचे प्रकुलपती आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार आगामी यांनी सांगितले की, काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यपालांनी आपल्या विधानसभेतील अभिभाषणात सांगितले होते. त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या प्रगतीच आढावा घेतला. आजवर झालेल्या संशोधनांची माहिती सादर केली. तसेच विद्यापीठ राबवत असलेले विविध उपक्रम आणि संशोधने याबाबत माहिती दिली.
समारंभाला रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भरत साळवी, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांतधिकारी शरद पवार उपस्थित होते.
समारंभात राज्यपालांच्या हस्ते ३४ पीएचडी, १०५ पदव्युत्तर पदवी आणि दोन हजार १०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात दोन वर्षांच्या सुवर्णपदक विजेत्यांचाही राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पदवीदान सोहळ्यापूर्वी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यांनी स्वतः यातील प्रत्येक दालनास भेट देऊन विविध संशोधनांची माहिती जाणून घेतली.


