ग्रंथालयसेवेचा रौप्यमहोत्सव

१८ मार्च १९९८… बरोबर २५ वर्षे झाली त्या घटनेला… त्या दिवशी मी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या महाराष्ट्राच्या वाचन संस्कृतीची, साहित्य क्षेत्राची शान असलेल्या जिल्हा नगर वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळाचा सदस्य झालो. म्हणजेच या वर्षीच्या १८ मार्चला वाचनालयातील माझ्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

१९८१ च्या एप्रिल महिन्यात ८२५ या अनुक्रमांकाने वाचनालयाचा वाचक सभासद म्हणून मी वाचनालयाशी जोडला गेलो. १९९८ साली व्यवस्थापक मंडळ सदस्य झालो अन् लगेचच कार्यवाह म्हणून माझी निवड झाली. कै. डॉ. ज. शं. केळकर, कै. डॉ. वि. म. शिंदे, कै. दादासाहेब शेट्ये, सन्माननीय अरुण नेरूरकर अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली.

वयाच्या ३२ व्या वर्षी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या प्रथितयश संस्थेचा कार्यवाह म्हणून दायित्व स्वीकारले. त्यावेळी मन, वृत्ती एवढी परिपक्व नव्हती. तरुणपणीचा उत्साह होता, आक्रमकता होती; पण वाचनालय व्यवस्थापन, कार्यपद्धती, तिथली कमकुवत अर्थसामग्री याचा कोणताच विचार केलेला नव्हता. माझ्या वडिलांचे स्नेही मोहन पाटकर यांनी मला सांगितले आणि मी वाचनालयाच्या व्यवस्थापक मंडळात गेलो.

वाचनालयाचा कार्यवाह झाल्याबरोबर त्याच दिवशी त्यावेळचे रत्नागिरीतील प्रथितयश कंत्राटदार पी. डी. महाजन यांनी मी कार्यवाह झालो म्हणून वाचनालयाला किमती संगणक संच भेट दिला. १९९८ मध्ये संगणक ही फार मोठी म्हणजे ७० ते ८० हजार रुपयांची वस्तू होती. अशी महत्त्वपूर्ण देणगी प्रारंभीच मिळाली, त्यामुळे उत्साह वाढला.

मी कार्यवाह असलो, तरी ज्येष्ठ विभूतींच्या छत्रछायेखाली वावरत होतो. थेट जबाबदारी आलेली नव्हती. एक प्रकारे उमेदवारीचा कालखंड अनुभवत होतो. मला आठवतेय, मी रत्नागिरीतल्या त्यावेळच्या दैनिकांच्या कार्यालयांबरोबर पत्रव्यवहार करून एका वर्षासाठी बहुतेक दैनिके मोफत वाचनालयात सुरू केली आणि दैनिकांवर होणारा खर्च वाचवला. आमदार अशोकराव मोडक यांच्या स्थानिक विकास निधीतून ७५ हजार रुपये वाचनालयासाठी मंजूर करून घेतले होते. यादरम्यान वाचनालयाचा शतकोत्तर अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीत धूमधडाक्यात पार पडला. मार्च २००३ मध्ये माझ्याकडे वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा आली. त्यानंतर लगेचच तत्कालीन रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार गोविंदराव निकम यांनी संचालक मंडळात ठराव करून ३ लाख ४६ हजारांची मोठी देणगी वाचनालयाला माझ्यावरील प्रेमाने दिली. त्यातून नवप्रेरणा मिळाली.

वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून २००३ पासून गेली २० वर्षे मी काम पाहत आहे. माझ्या या प्रदीर्घ कारकिर्दीची २५ वर्षे माझ्यासाठी संस्मरणीय झाली, यातच कृतार्थता वाटते.

अथक प्रयत्नांनी वाचनालयाची आर्थिक स्थिती सुधारण्यात आलेले यश, वाचनालयासाठी भौतिक सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न… त्यामुळे वाचनालयाच्या कार्यालयाला प्राप्त झालेले टिपटॉप रूप, पुस्तकांची रोलिंग कबर्ड सिस्टीम, अद्ययावत हॉलची उभारणी, वाचनालयाचे अंतर्गत संपूर्ण नूतनीकरण, रंगरंगोटी, जीर्ण सिमेंटचे पत्रे बदलून नवे स्टीलचे पत्रे बसवून घेण्याचा यशस्वी उपक्रम असे अनेक उपक्रम या कालखंडात पार पाडता आले.

शासकीय मदतीवर विसंबून न राहता अपल्या प्रयत्नांच्या आधारे निधी उभारत हे उपक्रम प्रयत्नपूर्वक पार पाडता आले. वाचनालयाचे रूप विलोभनीय ठेवता आले. वाचनालय व्यवस्था अद्ययावत नवीन तंत्रज्ञानाने युक्त राहावी, यासाठी वाचनालयाच्या सेवांचे संगणकीकरण, स्वतंत्र सॉफ्टवेअर, वाचनालयाच्या पुस्तकाच्या तपशीलवार नोंदी दर्शक स्वतंत्र अॅप केले.

(अॅपची लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.aaryaksolutions.ratnagirinagarvachanalay)

याबरोबरच या २५ वर्षांत पुस्तकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक करण्यात आलेले यश खूप लक्षणीय असल्याचे मी मानतो. प्रकाशित झालेले पुस्तक तत्काळ रत्नागिरी वाचनालयात उपलब्ध व्हावे, असा कटाक्षाने प्रयत्न यशस्वी पण केला. आज वाचनालय १ लाख ११ हजार ग्रंथसंपदेचे धनी आहे. अठराव्या शतकातील काही पुस्तके, तसेच शेकड्यांनी दुर्मिळ पुस्तके अमूल्य ठेवा रूपात वाचनालयात उपलब्ध आहेत. या पुस्तकांची उत्तम निगा राखत ही ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हरसंभव प्रयत्न करताना खूप समाधान मिळते.
गेल्या २५ वर्षांत पुस्तक खरेदीसाठीचा निधी कधीही कमी पडू न देण्याची कसरत साध्य झाली आणि ग्रंथसंपदेने परिपूर्ण दालनांनी सरस्वती मंदिराचे रूप घेतले.

रत्नागिरी ही सुसंस्कृत नगरी. तेथे सरस्वतीचे उपासक अधिक. त्याचे प्रत्यंतर वाचनालयात येणाऱ्या वाचक संख्येने अधोरेखित होते. विपुल ग्रंथसंपदा आणि त्या संपदेचा आस्वाद घेणारे वाचक हे खरे वैभव रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने अनुभवत आहे. ज्या शहरात उत्कृष्ट वाचनालये नांदतात, ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून मान्यता पावते. तसा अनुभवही येतो. १९५ वर्षांच्या या सर्वांत जुन्या, पण अद्ययावत वाचनालयाने रत्नागिरी शहराचा सुसंस्कृत चेहरा अधिक प्रकाशमान केला, असे म्हणणे हे अतिशयोक्ती होणार नाही.

माझ्या या कारकीर्दीत हे वाचनालय विविध उपक्रम, कार्यक्रम यांनी बहरत ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेक व्याख्याते, अनेक कलाकार, अनेक माहितीपर कार्यक्रम, व्याख्यानमाला, मुलाखती असे विविधरंगी कार्यक्रम सुसंस्कृत श्रोत्यांच्या प्रचंड प्रतिसादात गेली २० वर्षे सातत्यपूर्ण पद्धतीने करता आले. माझ्या कारकिर्दीचे हे वैशिष्ट्य ठरले, याचे समाधान लाखमोलाचे आहे. वाचनालय हे सांस्कृतिक केंद्र व्हावे, जनमानसावर आरूढ राहावे असा प्रयत्न मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सातत्याने केला. कर्मचारीवर्गाचे पगार हा मुद्दा नेहमीच शासनावर अवलंबून न ठेवता वाचनालयाने प्रतिवर्षी पगारवाढ करत आपले कर्तव्य चोख बजावले आहे. अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात पगारासाठी भासलेली चणचण त्यापुढे कधीही जाणवू दिली नाही. हे आर्थिक शिवधनुष्य सातत्याने पेलता आले, ही स्वामीकृपा आहे.

जुन्या ग्रंथसंपदेचे डिजिटायजेशन हे आव्हान समोर आहे. जुनी झालेली इमारत नव्याने बांधणे, तत्पूर्वी शासन स्तरावर जागेच्या कराराला मान्यता मिळवणे ही दोन कामे अपूर्ण आहेत. वाचनालय द्विशतकाच्या उंबरठ्यावर उभे आहे. द्विशताब्दीच्या वर्षापर्यंत ही दोन्ही आव्हाने साकार करण्याचे उद्दिष्ट मनात रुंजी घालत आहे. जगन्नियंत्याचे आशीर्वाद मिळाले, तर स्वामीकृपेने हा संकल्प पूर्ण होईल. सलग २५ वर्षे एखाद्या संस्थेचे काम ध्यास घेऊन करणे, त्यात सातत्य ठेवताना ती संस्था सतत समाजाभिमुख ठेवणे ही कसरत आहे. इतका प्रदीर्घ काळ संस्थेबरोबर निगडित राहिल्याने वाचनालयाच्या स्पंदनांशी एकरूप झाल्याचा अनुभव मी सतत घेत आहे. वाचनालयासारख्या संस्थेचे काम यात प्रसिद्धीचे ग्लॅमर नाही, आर्थिक सुबत्ता नाही, अधिकार नाहीत, वाचकवर्ग कमी होत असल्याची ओरड सतत ऐकू येते. अशा स्थितीतही ‘घेतले व्रत हे…’ या स्वा. सावरकरांच्या उक्तीचे पालन करत वाचनालय सेवेची २५ वर्षे पूर्ण करण्याचा आनंद खूप मोठा आहे. हा क्षण खूप भाग्याचा आहे. २५ वर्षांत वाचनालयासाठी लाखो रुपये उभे करता आले, स्थिर आर्थिक पायावर वाचनालय उभे करता आले, ग्रंथसंपदा आणि वाचकवर्ग सतत वर्धिष्णु राहिला. पूर्ण पारदर्शकता जपता आली. हिशेबी कामकाज स्फटिकासारखे स्वच्छ ठेवता आले. यात खूप कृतार्थता आहे. या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले, योगदान केले, त्यातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास फार कष्टाचा झाला असता. या दोन्ही संस्थांचा मी प्रतिनिधी आहे, तरीही या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मी घेत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या वाचनालयाचे नामकरण केले, स्वामी स्वरूपानंद ज्या वाचनालयाचे वाचक होते, अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत, कलाकार, नररत्न ज्या वाचनालयात येऊन वाचनालयाला गौरवले, त्या वाचनालयाची गेली २५ वर्षे सेवा करता आली. सर्वांचे सहकार्य हे या प्रदीर्घ मार्गक्रमणाचे गमक आहे. सहकारी, स्नेही, वाचकवर्ग, कर्मचारी, राजकीय, तसेच सामाजिक नेते, पत्रकार मित्र या सर्वांचे अनमोल सहकार्य हेच या यशस्वी कारकिर्दीचे गमक आहे. मी निमित्त आहे. करवून घेणारा परमेश्वर आहे. स्वामीकृपेचा हा आविष्कार आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.

हे ग्रंथालय अधिकाधिक वाचकाभिमुख होवो, नवतंत्रज्ञानाचा प्रवाह सातत्याने अमलात येत राहो, ग्रंथसंपदा वर्धिष्णु राहो, सरस्वती आणि लक्ष्मी यांचा हा एकत्र सहवास सदैव हे ग्रंथालय अनुभवत राहो, हीच प्रार्थना.

या प्रवासात अनवधानाने कोणी दुखावले असेल, तर मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचे प्रेम, विश्वास, सहकार्य सदैव पाठीशी राहो आणि वाचनालयाची नवी आधुनिक इमारत लवकरात लवकर साकार होवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना.

  • ॲड. दीपक पटवर्धन
    अध्यक्ष, जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply