
मडगाव : कोकण रेल्वेमार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा आज (तीन जून २०२३) रोजी नियोजित असलेला उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. ओडिशात दोन जूनला सायंकाळी झालेली तीन रेल्वेगाड्यांच्या भीषण अपघातात २३०हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ९००हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचा नियोजित उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेमार्गावर या गाडीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्वांना ही गाडी सुरू होण्याची उत्सुकता लागून राहिली होती; मात्र कालच्या भीषण अपघातामुळे सर्वांचंच मन विषण्ण झालं आहे.
तीन जूनला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोकण रेल्वेमार्गावरची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाण्यासाठी सुटणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार होते. या कार्यक्रमाची मडगाव स्टेशनवर जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच, ज्या ठिकाणी ती गाडी थांबणार होती, त्या प्रत्येक स्टेशनवरही गाडीच्या स्वागताची जंगी तयारी झाली होती.

या पहिल्या गाडीतून प्रवास करण्यासाठी काही रेल्वे फॅन्स, तसेच पत्रकार मडगावमध्ये दाखल झाले होते; मात्र दुर्दैवी अपघातामुळे कार्यक्रम रद्द झाल्याने सर्वांचा उत्साह मावळला. वंदे भारत एक्स्प्रेस मडगावहून रिकामीच मुंबईला रवाना झाली. रत्नागिरीतील प्रा. उदय बोडस हेदेखील या गाडीतून पहिला प्रवास करण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून मडगावला दाखल झाले होते. त्यांनी आतापर्यंत कोकण रेल्वेमार्गावरच्या २२ नव्या गाड्यांतून पहिला प्रवास केला आहे.
प्रा. उदय बोडस यांनी आज (तीन जून) सकाळी मडगाव स्टेशनवरून कोकण मीडियाकडे व्यक्त केलेल्या भावना

‘वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर येत असल्याचा जो उत्साह होता, तो काल ओडिशात झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे एका क्षणात मावळला आहे. आता सगळे कर्तव्य म्हणून काम करत आहेत; पण कोणाच्यातच उत्साह दिसत नाहीये. मडगाव स्टेशनवरचा आत्ताचा फोटो काढायला मन तयार होत नाहीये. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी रिकामीच काल रात्री मुंबईला रवाना झाली. कोकण रेल्वेच्या १९९६च्या उद्घाटनाच्या प्रवासापासून अलीकडच्या तेजस एक्स्प्रेसपर्यंतच्या प्रत्येक पहिल्या गाडीने मी प्रवास केला. जनशताब्दी एक्स्प्रेस एलचएबी डब्यांसह धावू लागली, तेव्हा कोरोना निर्बंधांमुळे मला त्या गाडीतून जाता आलं नाही. त्यानंतर सुरू झालेल्या बुधाना ते मंगळुरू जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी या दोन गाड्यांमधून मी केलेले प्रवास अनुक्रमे २१ आणि २२वे होते. आजच्या वंदे भारत एक्स्प्रेसमधला प्रवास २३वा ठरला असता; मात्र दुर्दैवाने तो योग आला नाही.’
दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर जाहीर केली जाईल, असे कोकण रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

