रत्नागिरी नगर वाचनालयाचे १ जुलैपासून विशेष वाचक अभियान

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे येत्या १ जुलैपासून वाचक वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान दीड महिना चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

श्री. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरी नगरीचे वैभव असणारे १८२८ मध्ये स्थापन झालेले रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय त्यावेळी नेटिव्ह लायब्ररी म्हणून ओळखले जात होते. गेली १९६ वर्षे वाचनालय वाचकांना ग्रंथ उपलब्ध करून देत असून रत्ननगरीचे सुसंस्कृतपण अबाधित ठेवण्यात वाचनालयाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध वाङ्मयप्रकारची बहुरंगी पुस्तके या वाचनालयात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील मोजकी वाचन मंदिरे एक लाख पुस्तकसंख्या असलेली आहेत. अशा वाचनालयाच्या श्रेणीत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय येते. तेथे एक लाख ११ हजार ग्रंथसंपदा असून ते वाचनालयाचे वैभव आहे.

प्रत्येक नागरिकाने द्विशताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या या वाचनालयाचे वाचक सभासद व्हावे, यासाठी १ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत वाचक सभासद वाढवण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमधील अध्यापकवर्ग, शासकीय, निमशासकीय अधिकारी, प्रथितयश व्यावसायिक, शहरातील बुद्धिजीवी वर्ग रत्नागिरीतील शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळे, विविध संस्थांचे पदाधिकारी, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रामुख्याने युवावर्गाला संपर्क साधून वाचनालयाशी संलग्न करून घेण्यात येईल.

वाचक चळवळ अधिकाधिक वाढीला लागावी, यासाठी विविध उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने राबवले. उत्कृष्ट वाचक पुरस्कार, साहित्यिक कट्टा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, ग्रंथमित्र पुरस्कार, लेखक आपल्या भेटीला अशा विविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे. ग्रंथमित्र योजनेत ग्रंथमित्रांचे गट तयार करून वाचनालयातील जुनी ग्रंथसंपदा त्यांना उपलब्ध करून देऊन जुनी दुर्मिळ पुस्तके पुन्हा एकदा चर्चेत आणि वाचनात आणण्याचा प्रयत्न राहील. रत्नागिरीतील व्यासंगी वाचकांची सूची तयार करण्याचा मानस आहे.

दरवर्षी एका सन्माननीय, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. सुसंस्कृत रत्नागिरीची प्रतिमा जपत व्यासंगी वाचक वाढत ठेवण्यासाठी आणि रत्नागिरीचे मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र म्हणून जिल्हा नगर वाचनालय कार्यरत राहील, अशी योजना तयार करत असल्याचे अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply