अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीतून क्लासवन अधिकारी तयार व्हावेत – जयश्री गायकवाड

रत्नागिरी : अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीचे कार्य चांगले आहे. भविष्यात तुमच्यामधील क्लासवन अधिकारी तयार व्हावेत, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी त्या म्हणाल्या, पोलीस खात्यात मुलींनी यायचे की नाही, हा खेडेगावांत प्रश्न पडतो. काही जणांना दिवसभर १० ते ५ नोकरी, घरसंसारात राहायला आवडू शकते. पण क्लासवन ऑफिसर होऊन जनतेसाठी काम करण्याचे मी ठरवले. माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा नव्हता. अडचणी खूप आल्या. पण यातून मार्ग काढला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाही अनेकांनी पुण्या-मुंबईवाल्यांना यश मिळत नाही, यांना काय मिळणार, अशा प्रतिक्रिया होत्या. अनेक लोक पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ध्येयापासून परावृत्त करू शकतात, पण त्यावेळी दुर्लक्ष करा. माझा जन्म सामान्य कुटुंबात झाला. गावातच माध्यमिक शिक्षण झाले. दहावीला बोर्डात आले. लग्नानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. संसार, मुले असे आयुष्य जगतानाच स्पर्धा परीक्षेतून यश मिळाले. चार वर्षांत परीक्षा, मुलाखतीनंतर एक वर्षाचे प्रशिक्षण झाल्यानंतर पोलीस विभागात रुजू झाले. या प्रवासात आई-वडील, पती, सासरची मंडळी यांनी खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे आज खाकी वर्दी आहे, याची जाणीव आहे.

त्या म्हणाल्या, आज महिला अधिकारी घर-संसार सांभाळूनही पोलीस खात्यात चांगले काम करत आहेत. चांगले दिसण्यासाठी मुली पार्लरमध्ये जातात, त्याचप्रमाणे स्वतः ताकदवान बनण्यासाठी मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. पुढे काय करायचे आहे, ते कॉलेज जीवनातच मुलांनी ठरवले पाहिजे.

शिबिरात अप्पर तहसीलदार राकेश गिड्डे यांनी सांगितले की, इंजिनिअरिंग करताना शेवटच्या वर्षाला स्पर्धा परीक्षा दिली आणि २०१७ मध्ये नायब तहसीलदार झालो. वयाच्या एकविसाव्या वर्षी अधिकारी झालो. त्यानंतर पुन्हा परीक्षा दिली परंतु नापास झालो आणि २०१९ च्या परीक्षेत तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. दहावी, बारावीच्या परीक्षेत कोकण बोर्ड अव्वल असले तरीही कोकणात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण अनेकजण मुंबईत जायचे स्वप्न पाहत असतात. आई-वडिलांनीही मानसिकतेमध्ये बदल करून मुलांना स्पर्धा परीक्षेकडे वळायला प्रोत्साहन दिले पाहिजे. रत्नागिरीतील आम्ही क्लासवन अधिकारी आहोत. त्यांना भेटलात तर नक्की दिशा मिळेल. आपण जे काही करायचे ठरवले आहे त्यासोबत प्लॅन बीसुद्धा असला पाहिजे. मी तहसीलदार म्हणून काम करताना दाखले, जमीन महसूल, जमीनविषयक वादविवादात न्यायाधीश म्हणून काम करणे, रेशनकार्ड, निराधार योजना, सुमारे ४० तालुकास्तरीय समितीचे अध्यक्षपद सांभाळणे अशी अनेक कामे करतो.

यावेळी अरुअप्पा जोशी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी जयश्री गायकवाड यांचा सत्कार केला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी आणि अॅकॅडमीच्या समन्वयिका अ‍ॅड. सोनाली खेडेकर उपस्थित होत्या.

तेजस कळंबटे यांनी अ‍ॅकॅडमीच्या कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन प्रज्ञा नार्वेकर यांनी केले. अरुअप्पा जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांक विजेते अनुक्रमे दानिया सोलकर व श्रेयस गुरव यांचा सत्कार आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले राधेय पंडित व महेश झोरे यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. अ‍ॅड. खेडेकर यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply