अनेक गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाहीत, हे खरे आहे. लोकशाहीमध्ये कायदे आणि नियम असतात, पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कासाठी आंदोलने करावी लागतात. आपल्या मागण्या रेटाव्या लागतात. पण अनेक मागण्या अशा असतात की त्या का केल्या जातात, हेच समजत नाही. चांगले वेतन मिळणारे कायम कर्मचारी आणखी अधिक वेतनाची मागणी आंदोलनातून करतात. ती करताना त्यांच्याएवढ्याच शैक्षणिक आणि कौशल्यपात्रतेचे लक्षावधी तरुण बेरोजगारीचे जीवन कंठत आहेत, याची त्यांना जाणीव नसते. श्रमाच्या प्रत्येक क्षणाला मोल असलेल्या आजच्या आधुनिक काळात आयुष्यभर भरभक्कम पगाराची नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर कोणतेही श्रम न करताही भरभक्कम निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी असते. समाजातील दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या सुरक्षित नोकरदारांना आर्थिक प्रश्न भेडसावत असतात. ते जणू काही फक्त त्यांनाच भेडसावतात. रोजंदारी करणारे मजूर, अल्प मोबदल्यात काम करणारे कर्मचारी जणू सुखाचे जिणे जगत असतात!
कोणे एकेकाळी शिक्षक आणि त्यातही प्राथमिक शिक्षक म्हणजे त्या त्या गावातील निव्वळ साक्षरतेचे नव्हे तर संपर्काचे महत्त्वाचे केंद्र होते. कौटुंबिक पत्रे लिहिणे, मनिऑर्डर करण्यापासून ते शासकीय परिपत्रके आणि आदेशांचा अर्थ समजावून देण्यापर्यंतची गावातील लोकांची कामे शिक्षक करत असत. हेच शिक्षक आता लोकसंपर्काचे उत्तम माध्यम असलेली जनगणनेसारखी कामे अशैक्षणिक असल्यामुळे नाकारतात. ती कामे अशैक्षणिक असल्यामुळे आपल्याला देऊ नयेत, अशी मागणी करण्यासाठी आंदोलन करतात. लोकसंपर्काची अनेक कामे अशैक्षणिक म्हणून नाकारणारे आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याचे काम आपण करत असल्याचे मानणारे असंख्य शिक्षक दररोजचे वृत्तपत्रही वाचत नाहीत, अशी स्थिती आहे. स्वतःच्या वाचनासाठी, शाळांमधील तसेच गावातील बंद पडणाऱ्या वाचनालयांसाठी अधिक निधी मिळावा, यासाठी कोणत्या शिक्षक संघटनांनी आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही.
अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. अशीच एक विसंगत मागणी मंडणगडमधील रिक्षा व्यावसायिकांनी केल्याचे वाचनात आले. मंडणगडमध्ये इंधनाचा पुरवठा सुरळित होत नसल्यामुळे उदरनिर्वाह करणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इंधनाचा पुरवठा होत नसेल तर तो सुरळित करण्याची त्यांची मागणी अजिबात चुकीची म्हणता येणार नाही. पण त्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या निवेदनात पेट्रोल पंपावर आपल्याला सौजन्यपूर्वक वागणूक मिळावी, अशी एक मागणी केली आहे. ती वाचल्यावर आश्चर्यच वाटले. कारण ठरावीक अपवाद वगळता रिक्षाचालक प्रवाशांना सौजन्यशून्य वागणूक देण्यातच धन्यता मानताना दिसतात. प्रवाशांशी उद्धटपणेच वागले पाहिजे, असे जणू त्यांना त्यांचा रिक्षा चालविण्याचा परवाना देताना परिवहन कार्यालयाकडून सांगितले गेले असावे, अशी त्यांची वागणूक असते. सौजन्यशून्य वागणुकीबरोबरच मीटरप्रमाणे रिक्षा चालविणे हा गुन्हाच आहे असे मानणे, परिवहन विभागाने दरपत्रक आखून दिले असले तरी ते जुमानायलाच हवे असे नाही अशा ठाम विश्वासाने प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणे, भाडे नाकारणे अशी खरे तर दैवत मानले गेलेल्या प्रवाशांशी रिक्षाचालकांची वागणूक असते. त्यांनी मात्र आपल्याला सौजन्यपूर्वक वागणूक मिळावी, अशी अपेक्षा केली आहे. ही विसंगती नव्हे, तर दुसरे काय? त्यांना सौजन्य दाखवू नये, असे मुळीच नाही. पण तशी मागणी करताना आपण प्रवाशांशी कसे वागतो, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळाले पाहिजेत, हे तर खरेच. पण त्याचा भुर्दंड प्रवाशांना का भरायला लावला जातो, याचाही विचार रिक्षाचालकांनी करायला हवा. अन्यथा त्यांची सौजन्यपूर्ण वागणुकीची मागणी हास्यास्पद ठरते.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ११ ऑगस्ट २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ११ ऑगस्ट २०२३ रोजीचा अंक
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia11aug
…..
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : मागण्यांमधील विसंगती
https://kokanmedia.in/2023/08/11/skmeditorial11aug/
मुखपृष्ठकथा : वानर-माकडांना अभय, शेतकऱ्यांना भय : वानर आणि माकडांचा शेतीतील उपद्रव आता सहन करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त हवा, आम्हाला नुकसानभरपाई नको, अशी मागणी करत रत्नागिरीतील बागायतदार एकवटले आहेत. रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या सभेचा सविस्तर वृत्तांत…
जमीन खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? : महाजनी असोसिएट्सचे सीनिअर पार्टनर अॅड. प्रशांत पाध्ये यांचा लेख…
आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख…
रत्नागिरीची वाटचाल तेहरानच्या दिशेने? : डहाणूचे शशिकांत काळे यांचा लेख
या व्यतिरिक्त, वाचक विचार आणि अनुभवकथन
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

