स्थानिक लोककलांची उपेक्षाच

राज्य शासनातर्फे सध्या प्रत्येक जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सव सुरू आहे. रत्नागिरीतही पाच दिवसांचा महोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रातील विविध लोककलांचे प्रदर्शन या महोत्सवातून घडविण्यात आले. पाच दिवस दररोज देशविदेशात गाजलेल्या लोककला सादर करण्यात आल्या. अशोक हांडे यांनी सादर केलेला मराठी बाणा, शिवबा हे महानाट्य, शाहीर नंदेश उमप यांची महाराष्ट्राची संस्कृती, रत्नकांत जगताप यांनी सादर केलेली महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी आणि अवधूत गुप्ते यांची संगीत रजनी असे एकाहून एक अत्यंत बहारदार कार्यक्रम रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरीकरांचे मनोरंजन झाले. त्यांना महाराष्ट्रातील विविध संस्कृतींचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

या प्रमुख लोककला सादर करण्यासाठी दररोज सायंकाळी चार तासांपैकी साडेतीन तासाचा वेळ देण्यात आला. मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कोकणातील लोककला सादर करण्यासाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला होता. स्थानिक लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी महासंस्कृती महोत्सव आयोजित केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, पण रत्नागिरीत तरी स्थानिक लोककलांना चार तासांपैकी अवघा अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला होता. स्थानिक लोककलांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर स्थानिक लोककलांच्या सादरीकरणासाठी एवढ्या कमी वेळेचे नियोजन कसे करण्यात आले, असा प्रश्न पडतो. कलाकारांना रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाकडी, भजन, पालखी नृत्य अशा असंख्य लोककला केवळ अर्ध्या तासात सादर कराव्या लागल्या. लोककलांचे बहुतेक कार्यक्रम दोन तासांपेक्षा अधिक वेळेचे असतात. त्यातील पहिला अर्धा तास तर वातावरणनिर्मितीसाठीच जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावताराचा एक प्रयोग तर पाच तासांपेक्षा अधिक काळ चालतो. अशा स्थितीत अवघ्या अर्ध्या तासात लोककला सादर करण्याची वेळ स्थानिक कलाकारांवर आली.

वास्तविक एवढा मोठा महोत्सव भरवायचा असेल तर स्थानिक लोककलांना कितीतरी वाव देणे शक्य होते. त्यानिमित्ताने त्या लोककलांना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळाला असता. त्यांच्या लोककलांसाठी त्याचा हातभार लागला असता. वर्षभरापूर्वी चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे कोकणातील लोककलांचा महोत्सव भरविण्यात आला होता. त्यामध्ये पाच दिवसांत दररोज किमान सहा तास पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणातील लोककला सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. तरीही संपूर्ण महोत्सवात केवळ ४० लोककला सादर करणे शक्य झाले होते. राजापूर तालुक्यातील पाचल येथील महाविद्यालयीन प्राध्यापक विकास पाटील यांनी पाचल परिसरातील लोकधारा या केवळ पाचल या एकाच परिसरात सादर केल्या जाणाऱ्या लोककलांचा आढावा घेणारे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यावरून कोकणात किती प्रकारच्या लोककला आहेत, याची कल्पना येईल. अशा शेकडो लोककलांचा शोध घेणे, त्या सादर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, शक्य असेल तेथे त्यांचे दस्तावेजीकरण करणे अशा स्वरूपाचे काम शासनाततर्फे केले गेले पाहिजे. देशविदेशात मुळातच भरपूर प्रसिद्धी मिळविलेले आणि लक्षावधी रुपयांचे मानधन घेणाऱ्या लोककलाकारांचे कार्यक्रम शासनामार्फत सादर करण्याऐवजी अशा स्थानिक लोककलांना खरोखरीच प्रोत्साहन दिले जायला हवे होते. सादर झालेला महासंस्कृती महोत्सव उत्तमच होता. सादर झालेल्या लोककला उत्तमरीत्या सादर झाल्या. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला, पण स्थानिक लोककलांना प्रोत्साहन देण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निधी दिला गेला पाहिजे. तरच त्या लोककलांचे संवर्धन आणि जतन होणार आहे. मुळातच यशस्वी झालेल्या कलाकारांचे कार्यक्रम शासनामार्फत सादर करण्यापेक्षा छोटे असूनही मोठ्या जिद्दीने लोककला जोपासणाऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहनही दिले गेले पाहिजे. शासनातर्फे तशा कार्यक्रमांचे यापुढील काळात आयोजन होईल, अशी अपेक्षा आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १६ फेब्रुवारी २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply