खल्वायनची त्रिशतकमहोत्सवी मासिक संगीत सभा शमिका भिडे रंगविणार

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची तीनशेवी मासिक संगीत सभा येत्या शनिवारी, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोकणकन्या शमिका भिडे शास्त्रीय तसेच अभंग, नाट्यगीतांनी रंगविणार आहे.

ही सभा (कै.) शुभांगी रामचंद्र रानडे आणि (कै.) रामचंद्र दत्तात्रय रानडे स्मृती संगीत सभा म्हणून साजरी होणार आहे.

खल्वायनची पहिली मासिक संगीत सभा ८ नोव्हेंबर १९९७ रोजी दुसऱ्या शनिवारी झाली. करोना महामारीचा दीड वर्षाचा काळ वगळता १९९७ पासून आजपर्यंत सलग ३०० महिने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारचा हा उपक्रम संस्थेने यशस्वीरीत्या आयोजित केला आहे. येत्या शनिवारी त्रिशतकमहोत्सवी संगीत सभा होणार आहे.

सारेगमप लिटल चॅम्प्सच्या २००८ मधील पर्वात घराघरात पोहोचलेली शमिका हिचे संगीतातील प्राथमिक शिक्षण प्रसाद गुळवणी आणि सौ. मुग्धा भट-सामंत यांच्याकडे रत्नागिरीतच झाले. गेली १२ वर्षे विदुषी डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याची तालीम व सांगीतिक संस्कार प्राप्त करण्याचे भाग्य तिला मिळाले. आपल्या गुरू व आई वडिलांच्या आशीर्वादाने अनेक पुरस्कारांची मानकरी असलेली शमिका आज अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध संगीत कार्यक्रमांमधून रसिकांपर्यंत आपली कला सादर करत आहे.

शमिकाने दे धक्का, सोयरीक, पल्याड चित्रपटांसाठी पार्श्वगायन, कलर्स मराठी, सोनी मराठी, शीमारू या चॅनलसाठी टायटल साँग्स गायली आहेत. संगीत मेघदूत व संगीत चि. सौ. कां. रंगभूमी या संगीत नाटकांमध्ये भूमिका केली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा २०१९ सालचा सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री पुरस्कार, दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा उदयोन्मुख गायिका अभिनेत्री पुरस्कार, झी टॉकीजचा फेवरेट कोण २०२२ मध्ये सर्वोत्कष्ट पार्श्वगायिका नामांकन, झी मराठी लिटल चॅम्प्स २०२३ साठी मेंटॉर म्हणून तिचा गौरव झाला असून तिची ५० हून अधिक स्वतंत्र गाणी रिलीज झाली आहेत. तिने अनेक अल्बममध्ये गायन, अनेक संगीत महोत्सवांमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीत गायन केले आहे.

गुरुकृपा मंगल कार्यालयात होणाऱ्या तिच्या संगीत सभेला हार्मोनिअम चैतन्य पटवर्धन, तबला हेरंब जोगळेकर, पखवाज मंगेश चव्हाण आणि तालवाद्यसाथ अद्वैत मोरे करणार आहेत. सर्व रसिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply