विदुराची जन्मकथा

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा तिसरा भाग…
………….
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ।।

महर्षी व्यासांनी वरील श्लोकाच्या उच्चारणाने महाभारत कथनाला प्रारंभ केला. या महाभारतामध्ये भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्यांना हा जन्म का प्राप्त झाला याबद्दलच्या कथाही महर्षी व्यासांनी कथन केल्या आहेत. उदाहरणार्थ गंगापुत्र भीष्म यांची पूर्वजन्म कथा. यातील एक अत्यंत महत्त्वाची धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, परमज्ञानी अशी व्यक्तिरेखा म्हणजे विदुर! विदुर हा दासीपुत्र आहे. धृतराष्ट्र आणि पंडू हे त्याचेच भाऊ आहेत; पण विदुराचा स्वभाव आपल्या भावांपेक्षा खूप वेगळा आहे. तो अत्यंत सद्गुणी आणि खराखुरा तपस्वी आहे. विदुरामध्ये असलेले हे सर्व सद्गुण त्याच्या पूर्वजन्माचे निदर्शक आहेत. आजच्या लेखात आपण विदुराचा पूर्वजन्म समजून घेणार आहोत.

हस्तिनापूरच्या पूर्वेला एका अरण्यामध्ये मांडव्य नावाचे ऋषी होते. हे थोर ऋषी नेहमीच आपल्या तपश्चर्येत मग्न असत. एकदा ते ध्यानमग्न अवस्थेत असताना काही चोर त्यांच्या आश्रमामध्ये आले. या चोरांनी राजवाड्यात चोरी केली होती आणि राजाचे सैनिक त्या चोरांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते. आता आपण पकडले जाणार याची कल्पना आल्यानंतर चोरांनी सर्व मुद्देमाल मांडव्य ऋषींच्या आश्रमात टाकला आणि ते निसटले. त्यांच्या मागोमाग आलेल्या सैनिकांना तो मुद्देमाल मिळाला आणि त्यांना असे वाटले, की राजवाड्यात चोरी करून आलेला चोर ध्यान करण्याचं ढोंग करत बसला आहे. म्हणून त्यांनी मांडव्य ऋषींना पकडले आणि राजासमोर हजर केले. राजाने मांडव्य ऋषींना चोरीच्या आरोपाखाली सुळावर देण्याची आज्ञा केली. या कथेवरूनच मराठीमध्ये ‘चोर सोडून संन्याशाला सुळी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! मांडव्य ऋषी अशा अवस्थेत असतानाही त्यांना मृत्यू आला नाही. इतक्यात खरे चोर कोण याचा शोध लागला. एका तपस्वी ऋषींना आपल्याकडून शासन झाले, याचा राजाला पश्चात्ताप झाला आणि राजाने मांडव्य ऋषींना सुळावरून खाली उतरवले. त्यांची क्षमा मागितली. मांडव्य ऋषींनी राजाला क्षमा केली; पण आपल्याला ही शिक्षा का झाली, असा प्रश्न त्यांनी यमधर्माला केला. त्यावर यमाने सांगितले, ‘तुम्ही लहानपणी एकदा छोट्या पक्ष्यांना हातातील दर्भाने टोचले होते. त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला या प्रसंगात सुळावर जावे लागले.’ लहान वयामध्ये आपण पाप करतो आहोत हे त्या बालकाला कळतही नाही. म्हणून मांडव्य ऋषी म्हणाले, ‘तू मला अपराधाशिवाय शिक्षा केली आहेस. म्हणून मी तुला शाप देतो, की तुला भूतलावर जन्म घ्यावा लागेल.’ ऋषींच्या शापामुळे अंबिका राणीच्या सुनंदा नावाच्या दासीच्या पोटी जन्म घेतला तोच हा विदुर होय.
महाभारतामध्ये विदुराने सांगितलेली विदुरनीती खूप प्रसिद्ध आहे. युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी आले, तेव्हा ते विदुराच्या घरी राहिले होते, असाही संदर्भ आढळतो. देवांनी विदुराकडील साधे अन्नही मोठ्या प्रेमाने ग्रहण केले आणि ‘देव भावाचा भुकेला’ हेच दाखवून दिले. महाभारताच्या युद्धानंतर विदुराने वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि यथावकाश देहत्याग केला. त्या वेळी युधिष्ठिर तिथे उपस्थित होता. युधिष्ठिर हाही यमधर्माचाच अंश असल्यामुळे विदुराच्या शरीरातील चैतन्य त्याच्या शरीरात प्रविष्ट झाले.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply