ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा चौथा भाग…
………….
कौरव पांडवांचे गुरू असणारे द्रोणाचार्य हे भरद्वाज ऋषींचे पुत्र होत. म्हणून त्यांना भारद्वाज द्रोणाचार्य असेही म्हणतात. पांचाल देशाचा राजा पृषत आणि द्रोणाचार्यांचे वडील भरद्वाज हे दोघे मित्र होते. राजाच्या सांगण्याप्रमाणे भरद्वाजाने आपला मुलगा द्रोण याला राजपुत्र द्रुपदाच्या बरोबर शिक्षणासाठी पाठवले. आपल्या वडिलांप्रमाणेच द्रोण आणि द्रुपद यांचीही घनिष्ठ मैत्री झाली. दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. एकाला दुःख झाले तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असे. एक दिवस द्रुपदाने सांगितले, की ‘मोठेपणी मला राज्य मिळाले, की मी तुला त्यातील अर्धे राज्य देईन.’ यथावकाश शिक्षण पूर्ण करून द्रुपद आणि द्रोण आपापल्या घरी गेले. द्रुपद पांचाल देशाचा राजा झाला, तर द्रोण हा अध्ययन-अध्यापनामध्ये आपले जीवन व्यतीत करू लागला. पुढे द्रोणाचार्यांचे लग्न कृपाचार्यांची बहीण कृपी हिच्याशी झाले. त्यांना अश्वत्थामा हा मुलगा झाला. परिस्थिती चांगली नसल्यामुळे कृपी पाण्यामध्ये पीठ मिसळून तेच दूध आहे असे सांगून अश्वत्थाम्याला प्यायला देत असे. अज्ञानापोटी अश्वत्थामाही ते दूध म्हणून प्राशन करत असे. एक दिवस अश्वत्थाम्याला खरे दूध प्यायला मिळाले. ती चव लक्षात आल्यावर त्याने आपल्या घरचे दूध पिण्यास नकार दिला आणि खरे दूध हवे म्हणून हट्ट धरला. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्रोणाचार्य आपला बालमित्र दृपद याच्या दरबारात गेले आणि मित्राकडे गाईसाठी याचना केली. बालपणी अर्धे राज्य द्यायला तयार असणाऱ्या द्रुपद राजाने आता मात्र द्रोणाचार्यांची अवहेलना केली. त्यांना अपमानित करून रिक्त हस्ते दरबारातून बाहेर काढले. हातात सत्ता आणि संपत्ती आली, की माणसे नातेवाईक, मित्र यांना कसे विसरतात याचेच दर्शन इथे घडते.
‘मित्राकडून झालेल्या या अपमानाचा मी बदला घेईन,’ अशी प्रतिज्ञा द्रोणाचार्यांनी केली. पुढे त्यांनी भगवान परशुरामांकडून शस्त्रविद्या ग्रहण केली, अग्निवेशाकडून ब्रह्मास्त्र प्राप्त केले आणि ते हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला दुर्योधनासह इतर कौरव आणि युधिष्ठिरासह अन्य पांडवांचा विटी-दांडूचा खेळ रंगात आला होता. त्या खेळात विटी एका खोल विहिरीत पडली. अनेक प्रयत्न करूनही मुलांना ती विटी बाहेर काढता येईना. त्याच वेळी द्रोणाचार्य तिथे पोहोचले. त्यांनी ऐषिक अस्त्राचा उपयोग करून ती विटी बाहेर काढली. ही गोष्ट मुलांनी घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना सांगितली. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता होतीच. त्यामुळे द्रोणाचार्यांकडे असलेल्या अस्त्रविद्या प्रावीण्यामुळे त्यांना राजपुत्रांना शिकवण्याचे काम मिळाले. पुढे या मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले. आपल्याला आम्ही कोणती गुरुदक्षिणा द्यावी, असा प्रश्न मुलांनी विचारला. गुरू द्रोणाचार्यांनी त्यांना ‘द्रुपदाचा पराभव करून त्याला माझ्यासमोर हजर करा हीच माझी गुरुदक्षिणा’ असे सांगितले. कुरुकुळातील या युवा वीरांनी पांचाल देशाचा राजा द्रुपद याला हरवून त्याला द्रोणाचार्यांसमोर हजर केले. अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. आपला हा झालेला अपमान धुऊन काढण्यासाठी द्रुपदाने यज्ञ उपासना केली. उपासनेचे फळ म्हणून की काय त्याला धृष्टद्युम्न आणि द्रौपदी अशी दोन अपत्ये झाली. द्रौपदी ही अग्नीसारखीच तेजस्वी होती. तिला पांचाली असेही एक नाव आहे. महाभारत युद्धात याच धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांना मारले. गुरू द्रोणाचार्य आणि अश्वत्थामा उत्तम ज्ञानी होते; पण ते अधर्माच्या बाजूने लढत राहिले. हा दैवदुर्विलासच नव्हे काय? महाभारतातील कृप आणि द्रोण ह्या व्यक्तिरेखा विद्वान व्यक्तीदेखील स्वार्थापायी किती लाचार आयुष्य जगतात याचेच दर्शक आहेत.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

