ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा पाचवा भाग…
………….
आपल्या संस्कृतीत सात जण चिरंजीव आहेत असे सांगितले आहे. हे सप्त चिरंजीव म्हणजे सात वृत्तीची व्यक्तिमत्त्वे आहेत. जसे शस्त्र आणि शास्त्र यावर प्रावीण्य मिळवलेले परशुराम सर्व पृथ्वी जिंकतात; पण निर्मोही वृत्तीने इदं न मम म्हणत ती कश्यपांना दान देतात आणि स्वतःसाठी अपरान्त अर्थात कोकण भूमीची निर्मिती करतात. शून्यातून पुनर्निर्माण ही वृत्ती आजही अस्तित्वात आहे म्हणून परशुराम चिरंजीव आहेत. सत्याची बाजू घेताना वेळ पडली तर आपल्या नातेवाईकांशी लढण्याची बिभीषण वृत्ती आजही कायम आहे. आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने विश्वातील सर्व विषय स्वतः समजून घेऊन ते इतरांना समजाविण्याची व्यासवृत्ती असणारे बुद्धिमंत आजही आढळतातच ना! स्थलकाल मर्यादेमुळे हे विचारसूत्र आपणच पुढे न्यावे अशी वाचकांनाही विनंती करून मी महाभारताकडे वळतो.
या सप्त चिरंजीवांपैकी बली आणि बिभीषण सोडून उरलेल्या पाच जणांनी महाभारतात सहभाग घेतला होता असे दिसते. महर्षी व्यास यांनी कुरुकुळाचे वंशसातत्य टिकवण्यासाठी कार्य केले. महाभारताचे लेखन केले. अश्वत्थामा, कृपाचार्य हे तर यात प्रत्यक्ष सहभागीच होते. भगवान परशुरामांनी भीष्म, द्रोण, कर्ण यांना विद्या दिली होती. श्री मारुतीरायांचाही उल्लेख महाभारतात आला आहे. पांडवांमधील भीम हा महासामर्थ्यसंपन्न वीर होता. (डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते भीम हाच महाभारताचा खरा नायक आहे.)
एकदा भीमाला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला. आपल्याइतका बलदंड कोणीच नाही असा विचार करीत तो जंगलातून चालला होता. वाटेत एक वृद्ध वानर आपली शेपटी लांब पसरून बसले आहे असे त्याने पाहिले. त्याने त्या वानराला आपली शेपूट आवरून घे अशी आज्ञा केली. त्या वृद्ध वानराने आपण अतिअशक्त आहोत तरी आपली शेपूट तूच बाजूला सारून पुढे जा असे सांगितले. स्वतःच्या बाहुबलावर विश्वास ठेवून भीमाने ते पुच्छ हटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण व्यर्थ! अखेर भीम त्या कपिश्रेष्ठाला शरण गेला. हे कपिश्रेष्ठ म्हणजेच श्री महारुद्र हनुमान.
बाणांचा पूल मोडून श्री मारुतीरायांनी अर्जुनाचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असल्याचा अभिमानही मोडून काढला होता. त्या वेळी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनासाठी धावून यावे लागले होते. याच प्रसंगी श्री मारुतीरायांनी महाभारत युद्धात अर्जुनाच्या ध्वजावर बसण्यास मान्यता दिली होती. यामुळेच ज्याच्या रथावरील ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत त्या अर्जुनाला कपिध्वज हे नाम प्राप्त झाले आहे. ज्या भक्तश्रेष्ठ मारुतीरायांनी रामायण काळात मोठा पराक्रम गाजवला; पण ‘हे मी केले’ असे कधीच म्हटले नाही. त्यांना भक्तांमध्ये निर्माण झालेला अहं कसा बरे रुचावा? मी न कर्ता अशी भावना ज्यांच्या मनी आहे त्यांचा वार कोणता हे सांगताना ‘न कर्त्याचा वार शनिवार’ असे म्हटले जात असेल का? भक्ताने अहंकारशून्य असावे, ही हनुमान वृत्ती आजही खऱ्या सद्भक्तांच्या ठायी आढळते, हेच हनुमंतांचे चिरंजीवित्व म्हणता येईल का? हा भाव आपल्या ठायी आला तरच भक्तिपंथावरून आपला प्रवास सुरू होईल. म्हणूनच,
शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता ।
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या बा सुभटा ।
तुका म्हणे रुद्रा अंजनीचिया कुमरा ।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

