ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा दहावा भाग…
………….
महाभारताने संपूर्ण विश्वाला दोन महत्त्वाच्या देणग्या दिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. आजच्या लेखात आपण या अद्वितीय ग्रंथाची ओळख करून घेऊ या. श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचा प्रारंभ धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातील संवादाने होतो. जन्मांध असणारा राजा धृतराष्ट्र संजयाला विचारतो –
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पांडवाश्चैव किमकुर्वत संजय ।।
हा प्रश्न विचारण्याचे कारण काय, तर युद्ध सुरू होण्याआधी धृतराष्ट्राने आपला बुद्धिमान, बोलण्यात चतुर असणारा मंत्री संजय याला पांडवांकडे त्यांची समजूत काढण्यासाठी पाठवले होते. हा भाग महाभारतात संजयशिष्टाई म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या भेटीदरम्यान संजयने धर्मराजाला हे युद्ध करणे कसे चुकीचे आहे, याने कुलक्षय होईल, अराजक माजेल असे सांगितले होते. धृतराष्ट्र आणि त्याचे सल्लागार यांचा अंदाज होता, की धर्मराजा हे ऐकून युद्ध करणे टाळेल; पण तसे झाले नाही. कौरव आणि पांडव युद्धासाठी समोरासमोर उभे राहिले. आपण केलेल्या कूटनीतीचे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी वरील प्रश्न विचारला गेला. गंमत अशी, की या संजयशिष्टाईचा प्रभाव धर्मराजावर न पडता अर्जुनावर पडला आणि हातातील धनुष्यबाण टाकून अर्जुन ‘युद्ध नको’ असे म्हणू लागला. श्रीमद्भगवद्गीतेचा हा प्रारंभीचा प्रसंग आहे.
अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादातील श्लोकांची अध्यायानुसार विभागणी महर्षी व्यासांनी केली. या ग्रंथामध्ये अठरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत. या ग्रंथाचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही पडलेला दिसतो. प्रख्यात शास्त्रज्ञ रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बची चाचणी घेतली, त्या वेळी झालेल्या स्फोटाचा प्रकाश पाहून त्यांच्या मुखातून अकराव्या अध्यायातील ‘दिवि सूर्य सहस्रस्य…’ हा श्लोक बाहेर पडला. याच शास्त्रज्ञाने राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या शोकसभेतील आपल्या भाषणाची सुरुवात ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:’ या श्लोकाने केली. म्हणजेच ओपेनहायमर याची संपूर्ण भगवद्गीता अर्थासह पाठ होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, योगी अरविंद यांच्यासारख्या लोकनेत्यांवरही श्रीमद्भगवद्गीतेचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
श्रीमद्भगवद्गीता तीन जणांनी ऐकली. त्यावरून तीन प्रकारचे श्रोतेच समोर येतात. पहिला श्रोता अर्जुन, ज्याने भगवंतांचा उपदेश श्रवण करून तत्काळ आचरणात आणला. दुसरा श्रोता संजय. महर्षी व्यासांच्या कृपेने त्याला या ग्रंथाचे दूर श्रवण करता आले. त्याने ते ऐकले, त्याचा आनंद घेतला; पण ते धृतराष्ट्राला सांगितल्यानंतर स्वतःत काही बदल केले नाहीत. आपण एखादी गोष्ट ऐकतो, त्याचा दुसऱ्याला उपदेश करतो; पण स्वतः काही करायचे आहे हे मात्र विसरतो, हा श्रोत्यातील दुसरा प्रकार होय. राजा धृतराष्ट्राने संजयाकडून गीता श्रवण केली; पण त्याचा काडीमात्र परिणाम त्याच्यावर दिसला नाही. श्रोत्यांमधील हा तिसरा नमुना होय. आपण सद्-ग्रंथ कसा ऐकावा याचा विचार ज्याचा त्याने करावा हेचि भले. धृतराष्ट्राने गीता ऐकल्यानंतरही त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. म्हणजे ते श्रवण फुकट गेले का? तर तसे नाही. महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्या वेळी जंगलाला लागलेल्या आगीमध्ये धृतराष्ट्राचा मृत्यू झाला. त्या प्रसंगी स्थितप्रज्ञाप्रमाणे ध्यान लावून तो मृत्यूला सहज सामोरा गेला. यावरून गीतेचा त्याच्यावरही प्रभाव पडला असे दिसते.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

