केल्याने होत आहे रे…

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा अकरावा भाग…
………….
श्रीमद्भगवद्गीता ह्या अठरा अध्यायी ग्रंथाच्या सुरुवातीला अर्जुन आपल्या नातेवाईकांच्या मोहात पडतो आणि मी युद्ध करू शकत नाही असे देवांना सांगतो. आजपर्यंत अनेक युद्धे लढणारा हाच महायोद्धा आता मात्र युद्धाचे दुष्परिणाम काय आहेत ते सांगू लागतो. श्रीभगवंत त्याला आपल्या बोधामृताने भानावर आणतात आणि गीतेच्या अखेरीस अर्जुन श्री भगवंतांना ‘माझा मोह नष्ट झाला, कर्तव्याचे भान जागे झाले,’ असे सांगतो. थोडक्यात, श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ वाचकाला तुझे कर्तव्य काय आहे याची स्पष्ट जाणीव करून देतो. ‘आपले कर्तव्य निष्काम बुद्धीने कर’ हा कर्मयोग शिकवतो. आपण जे जे काही करतो ते सगळे श्रीभगवंतांना अर्पण करावे असा भक्तियोगही शिकवतो आणि सर्वांठायी एकमात्र परमात्मा भरला आहे ते दाखवणारा ज्ञानयोगही अनुभवायला देतो. कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही गोष्टींचा बोध देणारा श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्तीच आहे. या ग्रंथाचे अध्याय विविध योगांच्या नावाने ओळखले जातात. उदाहरणार्थ पहिल्या अध्यायाला अर्जुनविषादयोग असे म्हटले आहे. आता विषाद म्हणजे अत्यंत दुःख हा योग कसा होईल? पण युज् म्हणजे जोडणे यावरून योग हा शब्द बनला आहे. अर्जुनाला झालेल्या आत्यंतिक दुःखामुळे तो भगवंतांशी जोडला गेला, म्हणून त्याचा विषाद हाही त्याच्यासाठी भाग्ययोगच ठरला. म्हणूनच अध्यायाचे नामकरण झाले अर्जुनविषादयोग!
या ग्रंथामध्ये श्रीभगवंतांनी ‘योग: कर्मसु कौशलम्’ यासारखी अनेक महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली आहेत. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने आपण केलेली सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत, असे श्री भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. आधुनिक काळात मॅनेजमेंट शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीताही अभ्यासावीच लागते. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी आपल्याकडे येणाऱ्या सन्माननीय अतिथींना श्रीमद्भगवद्गीतेची प्रत आवर्जून भेट म्हणून देतात. हेच या ग्रंथाचे महत्त्व आहे. आपणही हा ग्रंथ पाठ करावा. आपल्याकडून ७०० श्लोकांचे पाठांतर होईल का, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. त्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका, दूरदर्शनच्या निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांना संपूर्ण भगवद्गीता पाठ होती. एका मुलाखतीत त्यांनी गीता पाठ कशी केली ते सांगितले आहे. त्या म्हणतात, ‘मी कॉलेजला जायला लागले तेव्हा माझ्या वडिलांनी आदल्या दिवशीच्या बसच्या दोन तिकिटांच्या मागच्या बाजूवर दोन श्लोक म्हणजे प्रत्येक तिकिटावर एक श्लोक लिहून घेण्यास सांगितले. घरातून कॉलेजपर्यंत जाताना एक श्लोक पाठ कर आणि कॉलेजमधून घरी येताना दुसरा श्लोक पाठ कर, असे सांगितले.’ सुहासिनीताई सांगतात, ‘मी याप्रमाणे प्रामाणिकपणे रोज दोन श्लोक पाठ केले आणि दोन वर्षांत भगवद्गीता मला मुखोद्गत झाली.’ वाचकहो, सुहासिनीताईंना जे जमलं ते आपल्याला का नाही जमणार? ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीवर दृढ विश्वास ठेवू या आणि या २०२५मध्ये भगवद्गीतेचे किमान बारावा आणि पंधरावा असे दोन अध्याय पाठ करू या. श्री भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न करणे इतकेच आपले कर्तव्य आहे, यश देणारे श्री समर्थ आहेतच!
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।
।। गोपालकृष्ण भगवान की जय।।

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply