ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा बारावा भाग…
………….
एक दिवस भगवान श्रीकृष्ण ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसले होते. प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण कोणाचे ध्यान करतात याचे धर्मराजाला नवल वाटले आणि त्याने देवांना प्रश्न विचारला, की ‘देवा आपण कुणाचे ध्यान करत आहात.’ त्यावर पार्थसारथी भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, ‘शरशय्येवर पडलेले भीष्म, जे या वेळी विझू पाहणाऱ्या अग्नीसारखे होत आहेत, ते माझे ध्यान करीत आहेत. म्हणून माझे मनही त्यांच्याकडे लागले आहे.’ महाभारताच्या शांतिपर्वाच्या ४६व्या अध्यायात हा कथाभाग आला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ‘हे धर्मराजा, पुरुष सिंह भीष्म आपल्या कर्मानुसार स्वर्गलोकाला निघून जातील, तेव्हा ही पृथ्वी चंद्रहीन रात्रीप्रमाणे श्रीहीन होईल; म्हणून हे धर्मराजा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, यज्ञादिकर्मे, चारही आश्रमांचे कर्तव्यधर्म, राजधर्म यांबद्दल पितामहांकडून जाणून घे.’ श्री भगवंतांच्या या आज्ञेप्रमाणे सर्व पांडव द्रौपदीसह भीष्मांजवळ गेले. स्वतः भगवान श्रीकृष्णही या प्रसंगी उपस्थित होते. भगवंतांनी भीष्माचार्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले –
मनुष्येषु मनुष्येंद्र न दृष्टो न च मे श्रुतः।
भवतो वा गुणैर्युक्त: पृथिव्यां पुरुष: क्वचित्।। (महाभारत शांतिपर्व ५०.२८)
अर्थात, मनुष्यांमध्ये तुझ्यासमान गुणांनी युक्त पुरुष या जगात मी पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. पितामह भीष्मांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली आणि मान उंचावून त्यांना अभिवादन केले. यानंतर भगवान श्रीकृष्णाने भीष्मांना ‘सर्व पांडवांना यथार्थ ज्ञानाचा उपदेश करावा’ अशी आज्ञा केली. त्यावर भीष्मांनी म्हटले, ‘देवा, गुरू उपस्थित असताना त्यांच्यासमोर शिष्याने उपदेश करणे योग्य आहे का?’ त्यावर देवकीनंदन श्रीकृष्णांनी भीष्मांना ‘युधिष्ठिराला तुम्हीच ज्ञान देणे योग्य’ असे सांगितले. त्यांनी आपल्या कृपेने भीष्मांना वेदनामुक्त केले आणि नंतर वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध पितामह भीष्म आणि युधिष्ठिराचा संवाद सुरू झाला. या संवादाच्या प्रारंभीच भीष्मांनी पांडवांपैकी त्यांच्याबरोबर कोणी बोलावे ते सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वाच्या ५५व्या अध्यायामध्ये ८०० लोकांमध्ये भीष्मांनी घातलेल्या अटी वर्णन केल्या आहेत.
या अटी थोडक्यात अशा आहेत – ‘जो धर्मात्मा, राजश्रेष्ठ, सत्य, दान, तप अशा गुणांनी संपन्न आहे, जो सर्वांचे आदरपूर्वक आतिथ्य करतो, जो कोणत्याही कारणाने अधर्म करत नाही, धर्मावर ज्याचे आत्यंतिक प्रेम आहे आणि वेदांचे रहस्य ज्याला पूर्णपणे ठाऊक आहे, त्या पांडवाने माझ्याशी बोलावे.’ भीष्मांच्या या अटीप्रमाणे युधिष्ठिर आणि संवाद सुरू झाला. महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९व्या अध्यायात श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र आले आहे. धर्मराज युधिष्ठिराने गंगापुत्र भीष्मांना सहा प्रश्न विचारले. ते असे – मनुष्यासाठी परम धर्म कोणता? कशाचा जप केला असता प्राणिमात्रांची जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होते? सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणते? सर्वांचे आश्रयस्थान कोणते? कोणाची स्तुती करावी? कोणाची पूजा करावी?
या प्रश्नांच्या उत्तरादाखल भीष्म म्हणतात, ‘अशुभ कर्मांनी होणारी पापे दूर करण्यासाठी हे धर्मराजा माझ्याकडून सहस्रनाम श्रवण कर.’ त्यांनी सांगितलेल्या नामांची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात, ‘जी नावे गुणासंबंधी म्हणजे गुणामुळे प्रवृत्त झाली आहेत, त्यापैकी जी नावे प्रसिद्ध आहेत, ती मी तुला सांगतो.’ या सहस्रनामांमध्ये केवळ विष्णूंची नावे आहेत असे नाही, तर आदित्यादि देवांची, यज्ञाची, शंकरांची अशी अनेक नावे आली आहेत. या नावांशी जोडलेल्या काही कथाही आहेत. या सर्वांची तोंडओळख पुढील भागात करून घेऊ.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

