ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा पंधरावा भाग…
………….
यक्षाने विविध प्रकारच्या प्रश्नांच्या फैरी झाडून धर्मराजाची कसून परीक्षा घेतली. त्याने विचारलेला एक प्रश्न असा होता, ‘जिंकण्यास कठीण असलेला शत्रू कोणता?’ धर्मराजाने उत्तर दिले, ‘क्रोध हा जिंकण्यास सर्वांत कठीण शत्रू आहे.’ यक्षाने पुढील प्रश्न विचारला, ‘ज्याला अंत नाही असा रोग कोणता?’ धर्मराज उत्तरला, ‘लोभ हा अंत नसलेला रोग आहे.’ वाचकहो, आपणही आपल्या स्वानुभवाने युधिष्ठिराने योग्य उत्तरे दिली, असेच म्हणू शकाल! आपण लहानपणी मिडास राजाची गोष्ट ऐकली असेल. खूप ऐश्वर्य असूनही मिडास राजाने हात लावीन तेथे सोने असे मागितले. ही त्याची मागणी अर्थात त्याचा लोभ हा जणू मानसिक आजारच नव्हे काय? गजनीचा महम्मद याने भारताची, विशेषतः सोरटी सोमनाथाची अनेक वेळा लूट केली आणि विपुल संपत्ती गोळा केली. आपल्या अखेरच्या वेळी ती सर्व संपत्ती त्याने आपल्यासमोर मांडून ठेवायला सांगितली आणि त्याकडे पाहत पाहतच प्राण सोडला, हेही उदाहरण लोभ हा रोग आहे हे पटवणारेच आहे ना? यक्षाने विचारले, ‘साधू कोणास म्हणावे आणि दुर्जन कोणास म्हणावे?’ धर्मराजा म्हणाला, ‘जो प्राणिमात्रांवर प्रेम करतो तो साधू आणि ज्याच्या मनात कणभरही दया किंवा क्षमा नाही तो दुर्जन.’ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज याच प्रकारे साधूंचं वर्णन करताना म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा
मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त
दया करणे जे पुत्रासी तेचि दास आणि दासी
तुका म्हणे सांगू किती तेचि भगवंताच्या मूर्ती
महाभारतातील साधूची व्याख्या आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील साधुत्वाची लक्षणे यांच्यातील साधर्म्य आपल्या लक्षात आले असेलच.
यक्षाने आणखी एक सुंदर प्रश्न विचारला. ‘या जगातील सर्वांत मोठे आश्चर्य कोणते?’ युधिष्ठिराने त्याला तितकेच सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘दररोज शेकडो प्राणी मरतात हे पाहूनदेखील मनुष्य स्वतःला अमर समजतो हेच जगातले मोठे आश्चर्य आहे.’ सर्व प्रकारच्या प्रश्नांना धर्मराजाकडून समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे तो यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या एका भावाला जिवंत करतो. तू सांग कोणाला जिवंत करू?’ त्यावर धर्मराज म्हणाला, ‘माझ्यासाठी तू नकुलाला जिवंत कर.’ यक्षाने विचारले, ‘पुढे होणाऱ्या युद्धामध्ये खरे तर तुला भीम किंवा अर्जुन महत्त्वाचे आहेत, तरीही तू त्यांना जिवंत कर असे का नाही म्हणालास?’ त्यावर धर्मनिष्ठ युधिष्ठिर असं म्हणतो, की ‘हे यक्षा कुंतीला मी, भीम आणि अर्जुन अशी तीन मुले. त्यापैकी मी जिवंत आहे. माझी सावत्र माता माद्री हिला दोन मुले – नकुल आणि सहदेव. त्यापैकी मात्र कोणीच जिवंत नाही. माझ्या सावत्र मातेचा वंशही टिकावा, म्हणून मी भीम किंवा अर्जुनापेक्षा नकुलाला जिवंत कर असे सांगितले.’ धर्मराजाच्या या निःस्वार्थी उत्तराने यक्ष प्रकट झाला आणि म्हणाला, ‘मी यक्ष नाही तर यमधर्म आहे. मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच ही लीला केली. मी तुझ्या वागण्यावर प्रसन्न आहे. आता मी तुझ्या सर्व भावंडांना जिवंत करतो.’ असे म्हणून त्याने मृतप्राय झालेल्या चारही वीरांना जिवंत केले. त्यानंतर त्याने धर्माला सांगितले, ‘तुझ्यासाठी काही वर मागून घे.’ तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, ‘काम, क्रोध, लोभ यांना जिंकण्याचे सामर्थ्य मला प्राप्त व्हावे आणि दान, तप आणि सत्य या ठिकाणी माझे मन स्थिर राहावे.’ वाचकहो, विष्णुसहस्रनामावरील लेखांमध्ये भीष्माचार्यांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या धर्मराज याचा अधिकार आता आपल्या ध्यानी आला असेल. आजपुरते इतकेच!
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

