यक्षप्रश्न

ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा चौदावा भाग…
………….
‘यक्षप्रश्न’ हा एक सुंदर मार्गदर्शक कथाभाग महाभारतात आला आहे. बारा वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यावर पांडव काम्यकवनातून द्वैतवनात आले. एक दिवस एक ब्राह्मण पांडवांकडे आला आणि म्हणाला, ‘माझी अरणी आणि मंथा मी एका झाडाला टांगून ठेवली होती. तेथे एक हरीण आले आणि त्याने त्या झाडाला आपली शिंगे घासायला सुरुवात केली. त्या वेळी ती अरणी आणि मंथा ज्याच्यात ठेवली होती ती कापडी झोळी हरणाच्या शिंगात अडकली. हरीण तेथून पळून गेले आणि त्याच्याबरोबर माझी अरणी आणि मंथाही गेली. अग्निहोत्राच्या नियमाप्रमाणे ती अरणी आणि मंथा मिळत नाही, तोपर्यंत माझे अग्निहोत्र बंद आहे असे धरले जाईल आणि मला त्याचे प्रायश्चित्त करावे लागेल. तरी आपण त्या हरणाच्या शिंगात अडकलेली माझी झोळी मला मिळवून द्यावी.’ त्या असहाय ब्राह्मणाला मदत करण्यासाठी सर्व पांडवांनी द्वैतवनामध्ये खूप शोध घेतला; पण त्यांना ते हरीण सापडले नाही. अनेक तासांच्या भटकंतीमुळे पांडव मात्र तहानेने व्याकूळ झाले. त्यांना जवळच एक तळे दिसले. धर्मराजाने नकुलाला आज्ञा केली, की ‘जवळच्या त्या तळ्यातून सर्वांसाठी पाणी आण.’
आपल्या थोरल्या भावाच्या आज्ञेप्रमाणे नकुल पाणी आणण्यासाठी गेला. प्रथम आपण पाणी प्यावे, मग बाकी चौघांसाठी पाणी न्यावे, असा विचार करून तो पाणी पिण्यासाठी वाकला आणि ‘हे तळे माझे आहे, माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीस, तरच तुला पाणी प्यायला मिळेल,’ असा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने त्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या ओंजळीने तो पाणी पिऊ लागला. ओंजळीतील पाण्याचा ओठांना स्पर्श झाला मात्र, नकुल मृतप्राय होऊन पडला. बराच वेळ झाला तरी नकुल का येत नाही असा विचार करून धर्मराजाने सहदेवाला पाठवले; पण सहदेवाचीही नकुलासारखीच अवस्था झाली. इतकेच नाही, तर नंतर अर्जुन आणि भीमसुद्धा यक्षाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृतप्राय होऊन पडले. अखेर धर्मराज युधिष्ठिर तेथे आला. आपल्या चारही भावांची अवस्था पाहून त्याला खूप दुःख झाले. थोड्या वेळाने तोही पाण्याजवळ आला. त्यालाही ‘प्रथम प्रश्नांची उत्तरे दे मगच पाणी पी,’ असे यक्षाने सांगितले. धर्मराजाने यक्षाला सांगितले, ‘तू प्रश्न विचार. मला जमेल तशी मी उत्तरे देईन.’
यानंतरचा यक्ष-युधिष्ठिर संवाद हा यक्षप्रश्न म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रश्नांमधून युधिष्ठिराची बुद्धिमत्ता, नीती, धर्मशास्त्र यांचे सखोल ज्ञान आणि निःस्वार्थ बुद्धी या सगळ्याचेच सुंदर दर्शन घडते. आपल्या सदराच्या शब्दमर्यादेमुळे आपण सर्व प्रश्नांची चर्चा करू शकणार नाही; पण काही निवडक प्रश्नांचा येथे आढावा घेऊ या. ज्या जिज्ञासूंना या गोष्टींचा सखोल अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी पूजनीय वरदानंद भारती अर्थात अनंतराव आठवले यांच्या यक्षप्रश्नावरील ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा. यक्षाने युधिष्ठिराला विचारले, ‘पृथ्वीपेक्षा अधिक वजनदार कोण? आकाशापेक्षा उंच काय?’ या दोन प्रश्नांना उत्तर देताना धर्मराज म्हणतो, ‘माता ही पृथ्वीपेक्षा वजनदार आहे आणि पिता हा आकाशापेक्षा उंच आहे.’ यक्षाने आणखी एक प्रश्न विचारला, ‘वाऱ्यापेक्षा अधिक वेगवान कोण?’ युधिष्ठिराने सांगितले, ‘अर्थात आपले मन हे वाऱ्यापेक्षा अधिक वेगवान आहे.’ वाचकहो, आपण भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रातही मारुतीरायांचा वेग किती याचे वर्णन करताना ‘मनासी टाकिले मागे, गतीही तुळणा नसे,’ असेच म्हणतो ना? म्हणजेच मनाच्या वेगाची तुलना मारुतीरायांच्या वेगाबरोबर होते, इतके मन वेगवान आहे. यक्षप्रश्नांतील आणखी काही प्रश्नोत्तरे पुढील भागात पाहू.

– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply