रत्नागिरी : येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीच्या प्रत्यक्ष पटावरील व ऑनलाइन प्रशिक्षण घेणाऱ्या चार बुद्धिबळपटूंनी गेल्या काही कालावधीत उल्लेखनीय कामगिरी पार पाडत बुद्धिबळातील फिडे मानांकनाला गवसणी घातली.
राजस विजयकुमार मुळ्ये याने पुणे येथे झालेल्या जेकेज इसिए जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा व श्री. महेश्वरानंद सरस्वती स्मृती अखिल भारतीय स्पर्धा अशा दोन स्पर्धांत सहभागी होऊन एकूण चार फिडे मानांकित खेळाडूंविरुद्ध विजय प्राप्त केला. राजस याला नवीन वर्षात १६२७ एवढे जलद फिडे मानांकन प्राप्त झाले आहे. राजस सध्या बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. राजसला लहानपणी बुद्धिबळाची तोंडओळख प्रथम त्याची आई व नंतर कै. दिलीप टिकेकर यांनी करून दिली.
कणकवलीच्या यश देवू पवार याने गोव्यात पार पडलेल्या कै. चंद्रकांत नाईक स्मृती तसेच कै. गोपाळ सुखटणकर स्मृती या दोन अखिल भारतीय जलद बुद्धिबळ स्पर्धांत चांगली कामगिरी पाडत १५११ इतके जलद फिडे मानांकन प्राप्त केले. कणकवलीतील आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये सध्या आठवीत शिकणाऱ्या यशला प्रथमतः त्याच्या आईने बुद्धिबळ खेळण्यास शिकवले. त्याला सोलापूर येथील सुमुख गायकवाड यांचेदेखील मार्गदर्शन लाभले.
रत्नागिरीच्या जीजीपीएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकणारी सई भूषण प्रभुदेसाई हिने डिसेंबर महिन्यात पुणे येथे झालेल्या श्री. महेश्वरानंद सरस्वती स्मृती खुल्या जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चांगली कामगिरी करून १४६४ जलद फिडे मानांकन प्राप्त केले. सई लहान असताना विशाल नाईक यांनी तिला बुद्धिबळाची तोंडओळख करून दिली.
निधी विनायक मुळ्ये हिनेदेखील मागील वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवीत क्लासिकल बुद्धिबळ प्रकारात १४६३ फिडे गुणांकन प्राप्त केले. तिने सरल्या वर्षात नांदेड येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निधी आठवीची विद्यार्थिनी आहे. निधीला सुरुवातीचे बुद्धिबळाचे धडे तिची ताई व वडील यांनी दिले. तसेच तिला विवेक सोहनी यांचेदेखील प्रशिक्षण लाभले आहे.
हे चारही बुद्धिबळपटू रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीचे विद्यार्थी आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

