ग्रामीण भागातील निरपेक्ष रुग्णसेवेसाठी कोलगावच्या वैद्या सौ. उमा प्रभुदेसाई यांचा गौरव

कोलझर : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे कार्यरत असलेल्या वैद्या सौ. उमा मिहिर प्रभुदेसाई (पूर्वाश्रमीच्या सत्त्वश्री कोनकर) यांचा ग्रामीण भागातील निरपेक्ष रुग्णसेवेसाठी गौरव करण्यात आला. कोलझर (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथील साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ या संस्थेने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या १० व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यात आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी वैद्या सौ. प्रभुदेसाई यांना गौरवण्यात आले. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
‘आरोग्य सेवा खरोखरच महत्त्वाची असते. त्यातही ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे महत्त्व फारच असते. हे डॉक्टर गोरगरिबांची सेवा करतात. अनेकदा येथील रुग्णांकडे तपासणीसाठी पैसे नसतात. तरीही हे डॉक्टर रुग्णाला आरोग्यसेवा देऊन तो बरा होण्यासाठी काम करतात. अशा डॉक्टरांकडे हिशेबाची वहीही घातलेली नसते. रुग्णसेवा हे आपले कर्तव्यच असल्याची जाणीव ठेवून हे डॉक्टर्स काम करत असतात. त्यांना मानावेच लागेल. अशाच निरपेक्षपणे काम करणाऱ्या वैद्या सौ. उमा प्रभुदेसाई यांच्या कार्याची दखल आमच्या संस्थेच्या सावंतवाडीतील संचालकांनी घेतली आणि त्यांचे नाव सुचवले. म्हणूनच त्यांच्या या कार्याचा आम्ही पुरस्कार देऊन गौरव करत आहोत,’ अशा शब्दांत संस्थेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी आपली भूमिका मांडली. कोलझरच्या सरपंच सेजल गवस यांच्या हस्ते सौ. उमा प्रभुदेसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोलझरच्या समाजसेवा हायस्कूलमध्ये २२ जून २०२५ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अबिद नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग विभाग अध्यक्ष नीता ढवण यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सौ. उमा प्रभुदेसाई यांचा परिचय
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांची कन्या सत्त्वश्री कोनकर यांनी २०१३मध्ये सावंतवाडीच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातून उत्तम गुणांनी बीएएमएस (आयुर्वेदाचार्य) पदवी प्राप्त केली. विवाहानंतर त्या प्रभुदेसाई वैद्य परिवारात आल्या. सौ. उमा यांचे पती श्री. मिहीर, दीर श्री. मुकुल आणि जाऊ सौ. रमा हे सारेच वैद्य आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे आयुर्वेद क्षेत्रात अध्यापन आणि रुग्णसेवा करत असलेले ज्येष्ठ वैद्य आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरू श्री. मुरलीधर प्रभुदेसाई आणि वैद्या सौ. माधुरी प्रभुदेसाई हे सौ. उमा यांचे सासू-सासरे. आयुर्वेद आणि रुग्णसेवा या क्षेत्राला संपूर्ण प्रभुदेसाई कुटुंबानेच वाहून घेतलेले आहे. सौ. उमा यांचा दवाखाना कोलगावात आहे. सावंतवाडी शहराच्या जवळ असले, तरी कोलगाव हे एक छोटे गाव आहे. साहजिकच तेथे समाजाच्या तळागाळातील आणि दिव्यांगांसह विविध समाजघटकांमधील रुग्णसंख्या मोठी आहे. तेथे त्या निरपेक्षपणे करत असलेल्या रुग्णसेवेची दखल या संस्थेच्या सावंतवाडीतील कार्यकर्त्यांनी घेतली आणि पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
वयाने आणि अनुभवाने लहान असूनही या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सौ. उमा प्रभुदेसाई यांनी संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आयुर्वेदाच्या माध्यमातून कायम अशी सेवा करत राहण्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणा आणि आशीर्वाद मिळाल्याची भावना व्यक्त करतानाच त्यांनी या यशामध्ये कुटुंबीयांचे पाठबळ, सहकार्य आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली.)

संस्था परिचय आणि अन्य पुरस्कारार्थी
कोलझरचे साबाजी सावंत यांनी २०१४ मध्ये साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या नावातच संस्थेचा उद्देश स्पष्ट होतो. या समाजघटकांसाठी काम करतानाच गेल्या चार वर्षांपासून संस्थेने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कारासाठी कोणतेही अर्ज न मागवता संबंधित व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन संस्थेकडून आपणहून या व्यक्तींची निवड केली जाते. यंदा या पुरस्कारांसाठी १० जणांची निवड करण्यात आली. त्यांची माहिती अशी –

तेजस देसाई (दोडामार्ग, पत्रकार-तरुण भारत)
प्रज्ञा परब (वेंगुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या)
शिवानंद उर्फ शैलेश भोसले (उद्योजक, गोवा-दोडामार्ग)
श्रीनिवास गवस (वकील, सावंतवाडी)
नंदकुमार नाईक (आदर्श मुख्याध्यापक, खेमराज बांदा हायस्कूल)
सागर पांगुळ (कोलझर हायस्कूल, शिक्षक)
शरयू परब (कोलझर जि. प. शाळा शिक्षिका)
श्यामराव देसाई (उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक)
प्रभाकर झिलू देसाई (बागायतदार)
वैद्या सौ. उमा मिहीर प्रभुदेसाई (आरोग्य, कोलगाव-सावंतवाडी)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply