रत्नागिरी : रत्नागिरी ते पंढरपूर ही रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची पहिली सायकलवारी यशस्वी करून दहा सायकल वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सायकल वारकऱ्यांना विठुरायाचे आशीर्वाद मिळाले.
ऊन, वारा, पाऊस, रस्त्याच्या कामामुळे खराब झालेले रस्ते यावर मात करत वारकरी पंढरपुरात पोहोचले. विठुरायाच्या दर्शनाने सर्वजण भावुक झाले.
सायकल चालवा, निरोगी राहा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा, प्रदूषण वाचवा, असा पर्यावरणपूरक संदेश या वारीतून या सायकलस्वारांनी दिला. तसेच भक्ती आणि शक्ती असा संदेश या वारीतून दिला. या वारीत विशाल भोसले, महेश सावंत, अमित पोटफोडे, आरती दामले, गजानन भातडे, नारायण पाटोळे, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर सहभागी झाले.
रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून वारीला सुरवात झाली. काकड आरती व प्रसाद घेऊन वारकरी पाली, साखरपा, आंबा घाटमार्गे मलकापूर, कोकरूड, कराड व उंब्रजला पोहोचले. रात्री पावसामुळे पोहोचण्यास उशिर झाला तरी उंब्रज भोसलेवाडीत ग्रामस्थ वाट पाहत होते. स्वागतावेळी सरपंच मारुती ढेबे, पत्रकार अभिजित पवार, पत्रकार प्रवीण कांबळे, ग्रामस्थ हभप किरण भोसले, संदीप भोसले, सुधाकर भोसले, प्रकाश भोसले, संदेश भोसले, विक्रम भोसले, स्वप्नील भोसले, संजय भोसले, अक्षय भोसले, अधिक भोसले, विजय भोसले, रतन भोसले आणि सौ. सीमा भोसले आदी उपस्थित होते.
वारीचे अनुभव सांगताना विशाल भोसले म्हणाले की, पंढरीची वारी करायची हे लहानपणापासूनच वाटत होते. माझे चुलते सायकलवरून पंढरीला जायचे. मलाही वाटले की, आपण पण एक दिवस जाऊ. गेल्यावर्षी मी एकटाच रत्नागिरीतून गेलो होतो. रत्नागिरीतून उंब्रज ग्रुपबरोबर पंढरपूरला पोहोचलो. वारी केल्यानंतर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला घेऊन यायचे ठरवले. ही कल्पना डॉ. नितीन सनगर, प्रसाद देवस्थळी, महेश सावंत, दर्शन जाधव, सचिन नाचणकर, मकरंद पटवर्धन व ग्रुपमध्ये सर्वांना सांगितले. त्यांनी मला सांगितले खूपच छान आहे, करा सुरुवात आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्यानंतर नियोजन ठरले.
भोसले म्हणाले की, वारीला जाताना कठोर परीक्षा घेतली. जाताना जोरदार पाऊस, खराब रस्ते, पुढे गेल्यानंतर आमच्या एका सायकल वारकऱ्याची चेन तुटली. उंब्रजहून पुढे भरपूर ऊन, जोराचा वारा होता. पण पांडुरंगाच्या कृपेने सर्व अडचणी दूर झाल्या. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने प्रवास पूर्ण केला. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व सदस्यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील दानशूर व्यक्तींची मदत मिळाली. आम्ही सुखरूप परतलो. पुढच्या वर्षी अजूनही मोठ्या संख्येने वारीसाठी आरसीसी सदस्य जाऊ.
आरती दामले यांनी सांगितले की, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेली रत्नागिरी-पंढरपूर सायकल वारी २०२५ म्हणजे केवळ एक सायकल राइड नव्हती, तर तो एक भक्तीचा, आत्म्याचा आणि अविस्मरणीय अनुभवांचा प्रवास होता. आरसीसीचे आधारस्तंभ, विशाल भोसले यांच्या अचूक नियोजनामुळे ही वारी इतकी सुरळित आणि यशस्वी झाली की प्रत्येक क्षणात त्याचे प्रतिबिंब दिसत होते.
रत्नागिरी ते उंब्रज हा मार्ग आंबा घाटाने आणि रस्त्यांच्या कामांमुळे काही ठिकाणी आव्हानात्मक होता. त्यात पावसाने थोडी भर घातली, पण सायकलस्वारांचा जोश किंचितही कमी झाला नाही. खरा आनंद सुरू झाला तो उंब्रज ते पंढरपूरच्या प्रवासात! वाटेतील गावकऱ्यांनी आमचे इतक्या आपुलकीने स्वागत केले, त्यांचे आदरातिथ्य इतके हृद्य होते की प्रत्येक सायकलस्वाराच्या मनात घर करून राहिले.
दुसऱ्या दिवशी भरपूर ऊन होते. पण ‘पांडुरंगाचे दर्शन घ्यायचेच’ या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण पुढे जात राहिलो. विठ्ठलमाऊलीच्या कृपेने सर्व अडथळे पार करत आम्ही यशस्वीपणे पंढरीची वारी पूर्ण केली. पंढरपूरच्या वेशीवर पोहोचताच मिळालेला आनंद शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. जवळपास ४००० सायकलस्वारांच्या उपस्थितीत, त्या भक्तिमय गर्दीत सामील होण्याचा आनंद आणि ऊर्जेचा अनुभव अवर्णनीय होता.
महेश सावंत यांनी सांगितले की, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे विशाल भोसले यांच्या नियोजनामुळे हा प्रवास अगदी सुखकर झाला. पहिल्या दिवशी १५० किलोमीटरचा पल्ला गाठून रात्री ११ वाजता भोसलेवाडी, उंब्रज या विशाल भोसले यांच्या घरी सर्व पोहोचलो. वाडीतील ग्रामस्थ आणि सरपंच आमच्या स्वागतासाठी थांबले होते हा क्षण खूप भारी होता. विशेष म्हणजे एवढ्या उशिरा पत्रकार मित्रही थांबले होते. मित्र परिवार, घरातील सर्व मंडळी आमची आतुरतेने वाट बघत होते.
सायकल वारकरी राकेश होरंबे अनुभव सांगताना म्हणाले की, रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारी ही माझ्या सायकलिंग क्षेत्रातील ३२५ कि.मी पहिलीच लांब पल्ल्याची राइड होती. उंब्रजला पोहोचलो राहण्या-जेवणाची व्यवस्था विशाल भोसले यांनी केली. दुसऱ्या दिवशी आम्ही उंब्रज ते पंढरपूर असा प्रवास चालू केला आणि आम्ही तो रात्री वेळेत पूर्ण केला आणि भक्तनिवासला पोचलो. पंढरपूरला पोहोचल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि थोडासा भावनिक झालो. संपूर्ण महाराष्ट्रातील साडेचार हजार सायकलिस्ट एकाच ठिकाणी भेटणे हे एक नशीबच आणि हे सर्व पांडुरंग घडवून आणत होता. संपूर्ण सायकलवारी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन पूर्ण केली.
अमित पोटफोडे यांनी सांगितले की, ऊन, पाऊस, वारा वाहतूक कोंडी, सायकलची दुरुस्ती अशा सर्व अडचणींवर मात करून सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नाव पंढरपूर सायकलवारीत नोंदवले गेले. त्यामागे सर्व क्लब मेम्बर, रत्नागिरीकर व आमचे मार्गदर्शक गुरू व मित्र विशाल भोसले, सौ. भोसले व त्यांचा मित्रपरिवार, आप्तेष्ट यांचे मोलाचे सहकार्य होते. उंब्रजच्या पुढे ठिकठिकाणच्या गावकऱ्यांनी आम्हाला सरबत, नाष्टा वगैरे दिले. एवढे प्रेम व सेवा आयुष्यात पहिल्यांदा अनुभवायला मिळाले. हा सर्व प्रवास हसत खेळत, आनंदात नाचत, गात यशस्वीरीत्या केला. पंढरपूरला प्रदक्षिणा, रिंगणामुळे ऊर्जा व आशीर्वाद मिळाले.
आता पुढील वर्षी अधिक सायकल वारकरी वारीला रवाना होणार असल्याचा निश्चय करण्यात आला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

