प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिल्यास इतिहासनिर्मिती होईल : प्रकाश देशपांडे

रत्नागिरी : ‘आजच्या काळात गुगलवर प्रत्येक गावाची माहिती मिळू शकते; पण राजीव लिमये यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘बखर कर्ल्याची’ यासारख्या पुस्तकाच्या लेखनासाठी माणसांशी नाळ जोडलेली असावी लागते. त्यांनी कर्ला या गावातील लोकांचे मन जाणून घेतले, म्हणूनच त्यांच्या हातून अशी कलाकृती घडू शकली. अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिले, तर मोठा इतिहास तयार होईल,’ असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराचे माजी कार्याध्यक्ष आणि मराठी साहित्य, नाट्य, तसेच ग्रंथालय चळवळीतील व्यासंगी आणि जाणकार व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रकाश देशपांडे यांनी केले. जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. २९ जून २०२५ रोजी संध्याकाळी रत्नागिरीतील ‘व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक रवींद्र सामंत, शिवसेना उपनेते बाळ माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर उपस्थित होते. या वेळी या पुस्तकाच्या ई-बुकचेही प्रकाशन करण्यात आले. (पुस्तक घरपोच मागवण्याविषयी अधिक माहिती बातमीच्या शेवटी दिली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

आपल्या गावावर आणि तिथल्या माणसांवर प्रेम असेल, जीवन अगदी समरसून जगलेले असेल, आजूबाजूच्या माणसांशी असलेले संबंध कोरड्या व्यवहारांसारखे न ठेवता त्या संबंधांमध्ये भावनेचा ओलावा असेल, त्यांचे जगणे नुसते पाहिलेले नव्हे तर एखाद्या पुस्तकासारखे वाचलेले असेल, तर त्यातून ‘या हृदयीचे त्या हृदयी’ नेणारा आणि आठवणींमध्ये रमवताना वाचणाऱ्याला जगण्याची उभारी देणारा एक उत्तम दस्तऐवज तयार होऊ शकतो, याचे उदाहरण रत्नागिरीकरांना पाहायला मिळाले. राजीव लिमये यांच्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रविवारच्या संध्याकाळी विविध वयोगटांमधील आणि विविध समाजघटकांमधील दोनशेहून अधिक माणसे जमली होती, हे या पुस्तकाचे आणि सोहळ्याचेही वेगळेपण. गावाचा दुवा सगळ्यांना कसा एकत्र आणतो, याचे हे उदाहरण. गावांच्या अनुषंगाने वैचारिक आणि भावनिक विचारांची देवाणघेवाण या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

कोकणातील गावांचे महत्त्व सांगताना प्रकाश देशपांडे म्हणाले, ‘कोकणवासीय समृद्ध आहेत. कारण येथील प्रत्येक गावाचा इतिहासाशी संबंध जोडलेला आहे. कोतवड्याचे पटवर्धन, कर्ल्याचे खासगीवाले लिमये, नेवऱ्याचे खेर, गोविंदपंत बुंदेले आणि बसणीचे विसाजीपंत लेले, बसणीतील सर्कसवाले विष्णुपंत छत्रे अशी अनेक मोठी नावे इतिहासाशी जोडलेली आहेत. या व्यक्ती बाहेर जाऊन मोठ्या झाल्या. ते परत आले नाहीत; पण हे सर्व जण राष्ट्रप्रेमी होते. राजीव लिमये यांनी कर्ला गावातील लोकांचे मन जाणून घेतले आणि माणसांशी नाळ जुळल्याने ते लिहू शकले. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या गावाबद्दल लिहिले, तर मोठा इतिहास तयार होईल.’

रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक अ‍ॅड. विलास पाटणे म्हणाले, ‘प्रत्येकाने आयुष्यात एक तरी पुस्तक लिहावे. कारण लोक कायम चांगल्या साहित्याच्या शोधात असतात. माणसे एकमेकांपासून दुरावत चालली असताना खेडेगावातच माणसे एकमेकांना सांभाळून घेतात. गावात अजूनही माणुसकी शिल्लक आहे आणि माणसाचे अस्सलपण शिल्लक आहे, असे दिसते. लिमये यांचे पुस्तक वाचताना निसर्गाच्या जवळ गेल्यासारखे भासते. त्यांनी यापुढेही अजूनही पुस्तके लिहावीत.’

ज्येष्ठ पत्रकार आणि सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर प्रास्ताविकात म्हणाले, ‘मी पत्रकारितेत ४५ वर्षे आणि प्रकाशन व्यवसायात १० वर्षे काम करतोय. सध्या वृत्तपत्रे, साप्ताहिके एका संक्रमणाच्या अवस्थेत आहेत. एआय तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रे, पुस्तके राहतील का असे बोलले जाते; पण हा स्थित्यंतरांचा काळ आहे; पण सकारात्मक विचारांचा प्रसार व्हायला हवा, दस्तावेजीकरण व्हायला हवे. त्यासाठी अक्षरवाङ्ममय प्रकाशित व्हायला हवे. कोकणात सापडलेली हजारो वर्षांपूर्वीची कातळशिल्पे हेसुद्धा लिपीपूर्वीचे संवादमाध्यम आहे. हा त्या काळातला दस्तऐवज म्हणावा लागेल. त्यामुळे लेखन प्रत्येकाने करावे. भविष्यात त्याचा दस्तऐवज म्हणून संशोधनासाठी उपयोग होईल. ‘बखर कर्ल्याची’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे २३वे पुस्तक आहे.’

या वेळी राजीव लिमये म्हणाले, ‘कोणालाही आपला गाव प्रिय असतोच. त्याप्रमाणेच मलाही तो आहे. निवृत्तीनंतर माणूस मागे वळून पाहतो. त्याप्रमाणे पाहताना मला लहानपणापासून अनुभवलेल्या साऱ्या गोष्टी आठवू लागल्या. त्या मी जशा आठवत गेल्या, तशा लिहायला लागलो. समाजमाध्यमांवरच्या त्या लेखनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘बखर कर्ल्याची’ हे पुस्तक साकारले आहे. अनेकांमध्ये सुप्त गुण असतील. अशा लेखकांनी लिहायला सुरुवात करावी. कॉर्पोरेट आणि औद्योगिक इतिहासाविषयीचे लेखन फार कमी झाले आहे. ते करण्यास वाव आहे. तसेच समाजातील विविध परंपरा, कोकणातील अनेक गोष्टींबद्दल लिहिता येईल. ग्रामीण संस्कृती, गावपण जपण्यासाठी लेखन करा. कोकणातील भावबंध जपले पाहिजेत. ते त्यातून जपले जातील. माझे पुस्तक वाचून एकाला तरी आपल्या गावाविषयी लिहावेसे वाटले, तर माझ्या लेखनाचे चीज झाले असे वाटेल.’

राजीव लिमये यांचे पुत्र वरुण लिमये यांनी या वेळी वडिलांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि वडलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर दिसलेल्या प्रतिमा उलगडल्या. या वेळी अनिकेत कोनकर, सौ. मुग्धा लिमये आणि इयत्ता सहावीतील स्पृहा भावे यांनी पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन केले. पुस्तकातील उत्तम रेखाचित्रांबद्दल राजीव लिमये यांच्या स्नुषा सौ. श्रेया लिमये यांचा गौरव करण्यात आला. वरुण लिमये आणि सौ. श्रेया लिमये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. तेजश्री लिमये-भावे यांनी सूत्रसंचालन केले.
📲 ई-बुक लिंक :
🔹 अँड्रॉइडसाठी
🔹 वेब ब्राउझर आणि आयफोनसाठी :

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

One comment

  1. खूप माहितीपूर्ण साप्ताहिक.मनःपूर्वक अभिनंदन संपादक आणि सर्वच टीमचे आणि खूप हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply