Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सायबर संस्कारांना प्रारंभ

Advertisements

समाजमाध्यमांच्या आजच्या काळात मोबाइल म्हणजे अत्यावश्यक साधन झाले आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत समाजमाध्यमे मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहेत. करोनाच्या काळात या माध्यमांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. पूर्वी केवळ संवाद साधण्यासाठी केला जाणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आर्थिक व्यवहारांपर्यंत येऊन ठेपला आहे. आता कोणत्याच कारणासाठी बँकेत जाण्याची वेळच येत नाही. आर्थिक उलाढाल याच माध्यमातून होत आहे; पण जेथे आर्थिक उलाढाल होते, तेथेच गैरव्यवहार आणि फसवणूक होत असते. त्यातूनच सायबर गुन्हे हा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढायला मोबाइलचा वापर करणारेच जबाबदार असतात. ते दक्ष राहिले नाहीत, तर त्यांची फसवणूक होते आणि गुन्हेगारीला खतपाणी मिळते. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. मोबाइलच्या माध्यमातून बारा लाखाची फसवणूक होण्यापासून आपण स्वतः कसे वाचलो, याची सुरस कथा त्यांनी यावेळी सांगितली. अशा तऱ्हेची फसवणूक व्हायला नको असेल तर शाळाशाळांमधून सतरावा सायबर संस्कार शिकविला गेला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केले.
रत्नागिरीसारख्या शहरात याबाबतची जनजागृती होत असतानाच राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांवरही मोठे दुष्परिणाम होतात. मुलांच्या मोबाइल वापराला वेळीच आळा घातला, तर हे दुष्परिणाम टाळता येतील आणि भविष्यातील सायबर गुन्हेही टाळता येऊ शकतील, या दृष्टिकोनातून राजापूर तालुक्यातील गोवीळ गावात या सतराव्या संस्काराची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे हे विशेष. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे. मुलांना शाळा-महाविद्यालयांमधून घरी पोहोचल्यानंतर सायंकाळी अभ्यास करता यावा, यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत टीव्हीसुद्धा बंद ठेवायचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. एखाद्या गावाने असा निर्णय घेणे खूपच वेगळे आहे.
मोबाइलमुळे सर्व जग मुठीत आले असल्यामुळे जगाशी क्षणात संपर्क साधला जाऊन जाऊ शकतो हे जितके खरे, त्याचबरोबर अत्यंत विकृत घटनाही मोबाइलमुळे घडत आहेत. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुले जर मोबाइलपासून दूर राहिली तर कितीतरी चांगला परिणाम घडून येऊ शकेल, गोवीळच्या ग्रामस्थांना हे कळले आहे. करोनाच्या काळात लागलेले मोबाइलचे व्यसन उग्र रूप घेऊन आता समाजासमोर आले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गुन्हे घडत आहेत. मोबाइलचा वापर सातत्याने करणे, त्यावर रील्स तयार करणे सहजसाध्य झाले आहे. त्यामुळे मुले अभ्यासापासून परावृत्त होऊन त्यामध्येच वेळ खर्च करतात, त्यामुळे अनेक चांगल्या सवयी कालबाह्य होऊ पाहत आहेत. वाचनाची सवय नष्ट होत आहे. व्यासंग नाहीसा होत आहे. मुलांची कल्पकता आणि बुद्धी वापरलीच जाणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या साऱ्यावर मोबाइलचा अनावश्यक वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मुळात वापरच कमी झाला तर गुन्ह्यांच्या प्रमाणालाही आळा बसेल. मोबाइलचा वापर केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच करण्याची गरज आहे. त्यासाठीच सायबर संस्कारांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील लोकांनी हा संस्कार अंगीकारला आहे, हे अत्यंत आश्वासक आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version