कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन; पत्नीचाही मृत्यू

नागपूर/रत्नागिरी : नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील मऊ कुशीनगर येथे जात असताना आज पहाटे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाचे चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रा. त्रिपाठी यांच्या सपत्नीक निधनाची घटना धक्कादायक असून, विश्वविद्यालय परिवारावर वज्राघात झाला असल्याची भावना विश्वविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी ते रत्नागिरीतही अनेकदा येऊन गेले होते. यंदाच्या फेब्रुवारीत विश्वविद्यालयाने क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा आगळावेगळा, भव्य कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित केला होता. ती त्यांची अखेरची रत्नागिरीभेट ठरली.

प्रा. हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, नव्यन्याय, सांख्ययोग, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि दार्शनिक होते. त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरूपदाची सूत्रे सात जून २०२३ रोजी स्वीकारली. दोन वर्षांच्या कार्यकाळात विश्वविद्यालयाच्या विकासासाठी आतापर्यंत ७० कोटी रुपये अनुदान, तसेच संशोधन प्रकल्प, विविध कार्यशाळा, सेमिनार, परिषदांकरिता त्यांनी अनुदान प्राप्त करून दिले आहे. वारंगा आंतरराष्ट्रीय परिसराच्या डॉ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते एक ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याशिवाय संशोधन छात्रावास, डॉ. तोतडे सभागृहदेखील त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. अगदी कालच सहा प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे पत्र त्यांनी विशेषत्वाने बोलावून सगळ्यांना दिले होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

त्यांना संस्कृत क्षेत्रातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा दांडगा अनुभव होता. प्रा. त्रिपाठी हे नवी दिल्लीतील श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय येथे भारतीय दर्शनशास्त्राचे प्राफेसर होते. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरूपदही भूषविले होते. त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली होती. सतत कार्यमग्न असलेल्या व विविध संस्थांमध्ये कार्य करण्याचा अनुभव असलेल्या प्रा. त्रिपाठी यांना संस्कृत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाकरिता भारत सरकारतर्फे महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार, पाणिनी सन्मान, तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानच्या विशिष्ट सेवा पुरस्कारासह अनेकानेक सन्मान प्राप्त झाले होते. त्यांच्या अनपेक्षित व धक्कादायक निधनाने संस्कृत क्षेत्राची मोठीच हानी झाली असल्याची प्रतिक्रिया संस्कृत क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे. कुलगुरूंच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

रत्नागिरीतील भाषणात लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव

उज्जैन येथील महर्षि सान्दीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कविकुलगुरू संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या काळात झालेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात बोलताना प्रा. त्रिपाठी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या कार्याचा गौरव केला होता. त्या वेळी ते म्हणाले होते, ‘ज्या रत्नागिरीत हे संमेलन भरले आहे, त्या रत्नागिरीला मोठी परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याला दिशा देतानाच समृद्ध भारतीय वेदपरंपरेचाही खूप अभ्यास केला आहे. मॅक्समुल्लर यांनी वेदांच्या निर्मितीचा कालखंड ख्रिस्तानंतर दोनशे-अडीचशे वर्षांचा असल्याचे सांगितले होते. मात्र टिळकांनी सखोल अभ्यास करून वेदांची निर्मिती ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षे झाल्याचे ओरायन या ग्रंथाच्या आधारे सिद्ध केले आहे. अशा आपल्या भारतीय समृद्ध वेदपरंपरेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply