बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची गरज : कुमार केतकर

लाडकोजी कृष्णा आयरे साहित्यनगरी, रिंगणे : ‘कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील रिंगणे येथे आयोजित केलेल्या अकराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आज (३१ जानेवारी २०२६) सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ साहित्यिक लाडकोजी कृष्णा आयरे यांचे मूळ गाव असलेल्या रिंगणे गावात भरलेल्या या साहित्य संमेलनाच्या नगरीला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

श्री. केतकर यांनी मुंबई आणि कोकणाच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. ‘कोणे एके काळी मुंबईतून येणाऱ्या मनिऑर्डरवर कोकणाची उपजीविका चालत असे. आता चित्र नेमके उलटे झाले आहे. कोकणातील जमिनी, जागा विकून मिळणारे पैसे मुंबईकरांना पुरवले जात आहेत. हे मुंबईचे आणि कोकणाचे बदललेले वास्तव आहे. श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर अशा जुन्या साहित्यिकांकडून त्यावेळच्या कोकणाचे चित्रण होत होते. कोकणवासीयांच्या भावभावना, नातेसंबंध, निसर्ग याचा उल्लेख त्यात असे. त्यावरून कोकण समजत असे; पण आता चित्र बदललेले आहे. या बदललेल्या वास्तवाचे चित्रण करणारे लेखन आज कुठेही दिसत नाही,’ असे श्री. केतकर म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. कोकणच्या लयाला जाणाऱ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकडून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. त्यामुळे हे पूर्णपणे वेगळे साहित्य संमेलन आहे. खऱ्या अर्थाने विचारांना चालना देण्याचे काम या संमेलनातून होते, असे ते म्हणाले.(उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

संमेलनाच्या निमित्ताने चित्रप्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन अशा विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांनी या प्रदर्शनांचे उद्घाटन केले. इतिहासाचे अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्रास्त्र प्रदर्शन, कणकवलीतील संदेश पत्रांचे संग्राहक निकेत पावसकर यांनी संकलित केलेल्या दोन हजारांहून अधिक पत्रांचे प्रदर्शन अशा प्रदर्शनांचाही त्यामध्ये समावेश आहे.

संमेलनात दुपारनंतर विविध परिसंवाद झाले. समाजातील विविध २६ मान्यवरांचा सत्कार रविवारी, दिनांक एक फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे भाषण

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply