रत्नागिरी : परदेशातील मराठी मुलांना ऑनलाइन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू केला जाईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
येत्या २८ एप्रिल रोजी वयाची ९६ वर्षे पूर्ण करणार असलेले ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार शनिवारी, दि. १४ फेब्रुवारी रोजी श्री. सामंत यांच्या हस्ते झाला. श्री. कर्णिक यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावे हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेला होता. त्याची अंमलबजावणी अनुवाद अकादमी तयार करून त्या अकादमीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय विश्व मराठी साहित्य संमेलनात घेत आहोत. ज्या लेखकाला त्याचे साहित्य मराठीतून हिंदीत करायचे असेल, मराठीतून कन्नडमध्ये करायचे असेल, मराठीतून तमीळमध्ये करायचे असेल तर त्याला निधी द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे.
श्री. सामंत पुढे म्हणाले, मराठी भाषा पुढे नेण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते मंत्री या नात्याने करायला नक्की तयार आहे. मी मंत्री झाल्यापासून २७ फेब्रुवारीचा कार्यक्रम आता गेट वे ऑफ इंडियाला करतो. ज्यावेळी आपण मोठ्या मंचावर करतो, त्यावेळी त्याची कुठेतरी चर्चा होते. त्यातून अजून तरुण साहित्यिक निर्माण व्हावेत ही या कार्यक्रमामागील भावना आहे. मराठी भाषा विभागाला वित्त मंत्री अजितदादांनी २६५ कोटी रुपये दिले. त्यामधून सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत. बालसाहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन असेल, युवा साहित्य संमेलन असेल, दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन असेल, परवा झालेले साताऱ्याचे मराठी साहित्य संमेलन असेल. आज मराठी भाषेचे दालन महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये उभारण्याची ताकद मराठी भाषा विभागाची आहे. काश्मीरलादेखील मराठी पुस्तकांचे गाव करण्याचा निर्णय माझ्या मराठी भाषा विभागाने घेतला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये कधी घटना घडली नव्हती, आज जेएनयूमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाचे मराठीचे अध्यासन केंद्र आहे. जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर एमएचा अभ्यासक्रम तयार केला. मुले छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकतात हे आमच्या मराठी भाषेचे काम आहे.

श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरीमध्ये अशी एक नगरपालिकेची शाळा आहे की ज्याचा आदर्श इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतला पाहिजे. त्या शाळेचे नाव दामले विद्यालय आहे. विद्यालयाच्या पहिल्या वर्गामध्ये १०० मुलांची प्रतीक्षा यादी असते. पहिली ते दहावीमध्ये आता पंधराशे विद्यार्थी शाळेत शिकतात.
मराठी साहित्य अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी साहित्याची किंमत आपल्याला तंजावरला गेल्यावर कळते. बेळगावला गेल्यावर कळते. दिल्लीला गेल्यावर कळते, परदेशात गेल्यावर कळते. पुढच्या वर्षभरामध्ये माझा मराठी भाषा विभाग अशा पद्धतीचे तंत्रज्ञान तयार करणार आहे की जो परदेशातला, परराज्यातला माणूस महाराष्ट्रामध्ये येत असेल, त्याला मराठी बोलता येत नसेल, तर त्याला आम्ही मराठीत बोलवून दाखवू. त्यासाठी आम्ही उपक्रम सुरू करत आहोत.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सत्काराला उत्तर दिले. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, जयू भाटकर यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कोकण विभागातील साहित्यिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात मधु मंगेश कर्णिक यांच्यावर लिहिलेल्या १०२ लेखांचा समावेश असलेल्या कृतज्ञता विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर विशेषांकाच्या ई-बुकचेही प्रकाशन करण्यात आले. या ई-बुकचा क्यूआर कोड सोबत दिला आहे. आयफोन आणि अँड्रॉइड फोनसाठी वेगवेगळे क्यूआर कोड देण्यात आले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

