पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामुळे गिर्यारोहणाची आवड लागेल : उषःप्रभा पागे

रत्नागिरी : पुणे विद्यापीठाने गिर्यारोहणाचा प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वताचा अभ्यास आणि हिमालयात गिर्यारोहण करण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण होईल, असा विश्वास ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांनी आज (२० डिसेंबर २०२०) रत्नागिरीत व्यक्त केला.

पर्यटन व्यवसायात नवनवे प्रयोग करत ‘पाऊलखुणा’ ही संस्था चालवणारे, रत्नागिरीतील भूगोलाचे माजी प्राध्यापक आणि गिर्यारोहक श्रीवल्लभ साठे यांच्या उमटलेली पाऊले या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे हा कार्यक्रम पार पडला. रत्नागिरीतील अंबर मंगल कार्यालयात झालेल्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी भूषविले. समारंभाला सुशेगाद जलविहारचे संजीव लिमये, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, प्रकाशिका डॉक्टर सौ. ऊर्जिता कुलकर्णी व्यासपीठावर होत्या.

श्रीमती पागे म्हणाल्या, की श्रीवल्लभ साठे यांनी सह्याद्रीतील भ्रमंती करताना बारीक-सारीक गोष्टींचा उल्लेख केला आहे. नव्याने गिर्यारोहण करू इच्छिणाऱ्यांना त्यामुळे निश्चितच मार्गदर्शन होऊ शकेल. सह्याद्री म्हणजे जैवविविधता असलेला हिमालयाच्या बरोबरीचा महाराष्ट्रातला भूभाग आहे. त्यात अनेक गड, किल्ले, डोंगर-दऱ्या असून त्या विविध वैशिष्ट्यांनी भरलेल्या आहेत. त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. सह्याद्रीचे आणि हिमालयाचे खूप जवळचे नाते आहे, असे मला वाटते. सह्याद्रीमध्ये भ्रमंती केल्यानंतर हिमालयात भ्रमंती करण्याची ओढ लागून राहते. म्हणूनच मोठे भाग्य असलेल्या आपल्या सह्याद्रीमध्ये भ्रमंती करण्याची सवय लागली पाहिजे. आमच्या गिरीप्रेमी संस्थेच्या सहकार्याने पुणे विद्यापीठाने तयार केलेला प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम त्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच वैयक्तिक दैनंदिन गरजा पूर्ण करणे, जेवण-खाण्याच्या सवयी, इतरांशी संपर्क आणि संवाद साधण्याची सवय अशा अनेक गोष्टी गिरिभ्रमणातून लागत असतात. त्यातूनच नवे व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. गड आणि किल्ल्यावरील पाण्याचे साठे हा तर एक संपूर्णपणे स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे. तरुणांना नव्यानव्या अभ्यासाच्या अशा दिशाही त्यातून मिळू शकतात. त्यादृष्टीने श्रीवल्लभ साठे यांचे पुस्तक मार्गदर्शक आहे. कोकणातील कोणी गिरीभ्रमणाविषयी लिहिलेले नाही. त्यामुळेही श्री. साठे यांचे पुस्तक उपयुक्त आहे.

संजीव लिमये यांनी पुस्तकातील बारकाव्यांचा आढावा घेतला. नकाशे आणि चित्रे यामुळे गिरीभ्रमणाकरिता आवश्यक माहिती पुस्तकातून मिळते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. श्रीधर ठाकूर म्हणाले, की ऐतिहासिक ठिकाणांबद्दलची माहिती मिळते, पण एखादा गड किंवा किल्ला पाहण्यासाठी त्या ठिकाणापर्यंत कसे जायचे, कोणत्या वाहनातून जायचे, त्या भागात कोणते खाद्यपदार्थ मिळू शकतात, जेवणाखाण्याची व्यवस्था कशी होऊ शकते, रेल्वे आणि एसटीच्या गाड्यांचे वेळापत्रक कसे आहे, याची माहिती मिळत नाही. श्री. साठे यांच्या पुस्तकातून ही माहिती मिळते. त्यामुळे ते खूपच मार्गदर्शक आहे. ज्या पिढीसाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे, असे मला वाटते त्यांच्या दृष्टीने संपूर्ण प्रवास त्यांनी टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवला आहे. त्यामुळे प्रवासाची आवड निर्माण व्हायलाही मदत होणार आहे. गिरीदर्शन, गिरिभ्रमण आणि अभ्यास अशा सर्वच टप्प्यांमध्ये हे पुस्तक उपयुक्त आहे.

दीपक पटवर्धन यांनीही पुस्तकाचा गौरव केला. पुस्तकासोबत दिलेले नकाशे, चित्रे आणि पुस्तकात केलेले प्रवासाचे वर्णन यामुळे तरुणांमध्ये गिरीभ्रमणाचा नवा छंद विकसित व्हायला नक्कीच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

लेखक श्रीवल्लभ साठे यांनी पुस्तकाविषयी सांगितले. पुण्याच्या प्रोज पब्लिकेशनच्या प्रकाशिका सौ. कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला.

प्रकाशनानिमित्ताने २५ डिसेंबरपर्यंत सवलत

पुण्यातील प्रोज पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. सह्याद्रीतील गिरीभ्रमण याविषयीचे वेगळ्या अंगाने जाणारे प्रवासवर्णन पुस्तकात आहे. भटकंतीची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संग्रही असावेच, असे हे पुस्तक. पुस्तकाची छापील किंमत ३२५ रुपये असून प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने येत्या २५ डिसेंबरपर्यंत सवलतीच्या दरात २२५ रुपयांमध्ये हे पुस्तक उपलब्ध असेल. त्यासाठी श्रीवल्लभ साठे (९९७५१८६०८५) यांच्याकडे संपर्क साधावा.

कार्यक्रम ऐकण्यासाठी …

प्रकाशन समारंभातील प्रमुख वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी सोबतचा व्हिडीओ पाहा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply