मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुढच्या वर्षअखेर पूर्ण – सुरेश प्रभू

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे, असे सांगून श्री. प्रभू म्हणाले की, ऑनलाइन मार्केटिंग, कर्जाच्या व्याजदरातील कपात, साडेतीन पटींनी वाढवलेली पीककर्जमर्यादा, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचे मातीपरीक्षण, थेट बँकेत जमा होणारे अनुदान अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबी मोदी यांच्या सरकारने अमलात आणल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन आता सुरू असले, तरी त्यावर लवकरच तोडगा निघेल, असेही श्री. प्रभू म्हणाले.

पत्रकारांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबतचा प्रश्न विचारल्यानंतर श्री. प्रभू यांनी नितीन गडकरी यांच्याशी झालेला पत्रव्यवहार आणि त्याला त्यांनी दिलेल्या उत्तराची प्रत पत्रकारांना दिली. त्यात नमूद केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील ४५० किलोमीटर लांबीचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यापैकी पनवेल ते झाराप या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील एकूण २३० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून सुमारे निम्मे म्हणजे दोनशे वीस किलोमीटरचे चौपदरीकरणाचे काम अजून व्हावयाचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव ते गोव्याच्या सीमेवरील झारापपर्यंतच्या महामार्गाचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे केवळ दहा टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र हे काम २०२२ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे श्री. गडकरी यांनी श्री. प्रभू यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर, वीर ते भोगाव खुर्द, तर परशुराम घाट ते आरवली हे रत्नागिरी जिल्ह्यातील काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते परशुराम घाट हे काम येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते वडपले आणि भोगाव खुर्द ते खवटी या मार्गाचे काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण होईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील वाकेडपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगावपर्यंतचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून राहिलेले काम येत्या मार्च महिन्यात पूर्ण होईल. राहिलेली सर्व कामे डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहेत, असेही श्री. गडकरी यांच्या पत्रात म्हटले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply