संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत प्राजक्ता काकतकर, तन्वी मोरे, महेंद्र मराठेंची बाजी

रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडिलकर यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्वामी स्वरूपानंद विरचित अभंग गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा सहा विभागांत घेण्यात आली. करोना प्रादुर्भावामुळे यंदा ती ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
प्राथमिक फेरीतून गुणानुक्रमे मुंबई – नीळकंठ अंबये, महेश घाणेकर श्रीधर घाणेकर, ठाणे – प्राजक्ता काकतकर, संजय बर्वे, उषा पाटील, पुणे – शुभांगी जोशी, रूपाली विखारे, केतकी दीक्षित व सौ. स्नेहल फडके (विभागून), रत्नागिरी – तन्वी मंगेश मोरे, मयुरेश जायदे व श्रीधर पाटणकर (विभागून), वैभव सोमण, सिंधुदुर्ग – महेंद्र मराठे, एकता खानोलकर आणि कोल्हापूर – हिमाली देवरुखकर, योगेश तावडे, प्रतीक पट्टणकुडे या १९ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली.

अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून सौ. आशाताई खाडिलकर यांनी काम पाहिले. या स्पर्धकांमधून प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले.

१० जानेवारी रोजी स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त पावस समाधी मंदिरात आशाताई खाडिलकर यांचा गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी त्यांच्याच हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्राथमिक फेरीतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. (वरील फोटोत तन्वी मोरे पारितोषिक स्वीकारताना.)

स्पर्धाप्रमुख म्हणून सेवा मंडळाचे विश्वीस्त हेमंत गोडबोले यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वरूपानंद समाधी मंदिर प्रमुख जयंतराव देसाई, अमर देसाई, कार्याध्यक्ष विजयराव देसाई, कार्यवाह हृषीकेश पटवर्धन यांच्यासह विविध सहा केंद्रांचे प्रमुख निरंजन गोडबोले, निखिल रानडे, संतोष आठवले (रत्नागिरी) शरद कदम व कल्पेश साखळकर (मुंबई, ठाणे), उमेश जमसंडेकर, पी. व्ही. फाटक (कोल्हापूर) व सौ. विदुला गोडबोले (पुणे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply