स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवात बालकलाकारांचा ‘स्वराभिषेक’

पावस : ‘स्वराभिषेक’च्या बालकलाकारांनी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांच्या केलेल्या बहारदार गायनामुळे स्वामींच्या जन्मोत्सवात साक्षात स्वरांचा अभिषेक श्रोत्यांनी अनुभवला. कार्यक्रमातील दोन अभंगांना यातीलच कलाकारांनी संगीतबद्ध केले होते, हे विशेष.

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाचे सर्व कार्यक्रम या वर्षी भाविकांना ऑनलाइन पद्धतीने अनुभवावे लागले. कोरोनाच्या सावटामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या दिंडी या वर्षी येऊ शकल्या नाहीत. दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येवरही मर्यादा होती. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मर्यादित उपस्थिती होती. हे सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने प्रसारित झाले.

१० जानेवारीला स्वामींच्या जन्मोत्सवातील मुख्य दिवशी ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ संस्थेच्या शिष्यवर्गाने सादर केलेल्या स्वामी स्वरूपानंद रचित अभंग गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सौ. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली सिद्धी शिंदे, चैतन्य परब, तन्वी मोरे, आदित्य पंडित, आदित्य दामले या त्यांच्या शिष्यवर्गाने सुमधुर गायनाने वातावरण भक्तिमय केले.
‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर चैतन्यने स्वतः संगीतबद्ध केलेला ‘कृपावंत थोर’ हा अभंग सादर केला. ‘सगुण निर्गुण, देवा तू सागर, शरण जाता रमावरा, हरी रूप ध्यावू, अंतर्बाह्य राम झालो’ ही स्वामी स्वरूपानंदांची अनेक पदे बहारदारपणे सादर करण्यात आली. ‘ॐ राम कृष्ण हरी’ या स्वामींच्या गजराने कार्यक्रमाची सांगता झाली. साक्षी जांभेकरने आपल्या निवेदनातून स्वामींचे विचार नेमकेपणाने रसिकांसमोर मांडले.

कार्यक्रमाला महेश दामले (संवादिनी), मंगेश मोरे (की-बोर्ड), मंदार जोशी (बासरी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज) आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. ‘एस. कुमार साउंड’चे उदयराज सावंत यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले. (कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply