रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ जानेवारी) करोनाचे नवे ३ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण आढळले, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आज एकाचा मृत्यू झाला. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात आज ३३६ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांत प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९४४५ झाली आहे. आज आणखी ६४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६४ हजार ८०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८७ आहे. त्यातील सर्वाधिक ३३ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २१ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९००२ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.३१ टक्के झाला आहे. आज एका मृत्यूची नोंद झाली असल्याने मृतांची संख्या ३४३ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे. खेड येथील ५२ वर्षांच्या पुरुषाचा २१ जानेवारीला सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (२३ जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज १३ नवे करोनाबाधित आढळले, तर ५ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१४९ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७७१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण
शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्याचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सुरू झाला आहे. त्यामध्ये आज (२३ जानेवारी) ५०० पैकी ३३६ (६७.२ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालय, तसेच गुहागर आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय व दापोली आणि कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३३६ जणांना लस देण्यात आली. सर्वाधिक ९२ कर्मचाऱ्यांना गुहागरमध्ये, तर सर्वांत कमी २५ कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात लस देण्यात आली. राजापुरात ५८, दापोलीत ६६, तर कामथे येथे ७५ जणांनी लस घेतली. लस घेतलेल्या कोणालाही कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत.

