किसान रेल्वेतून डहाणूचा चिकू थेट दिल्लीत

पालघर : फळे आणि भाज्या जलद गतीने थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी गेल्या ७ ऑगस्ट २०२० रोजी किसान रेल्वे योजना सुरू करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या किसान रेल योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. याच गाडीतून डहाणूचा प्रसिद्ध चिकू थेट दिल्लीला रवाना झाला.

पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकातून शनिवारी दुसऱ्यांदा डहाणूचा चिकू थेट दिल्लीत घेऊन जाणारी किसान रेल्वे मध्यरात्रीनंतर दिल्लीला रवाना झाली. यावेळी डहाणूतून 3 डब्यांमध्ये ३० टन चिकू पाठवण्यात आला आहे.

डहाणू – उधवाडा – अमलसाड – दिल्ली (आदर्शनगर) असा या गाडीचा मार्ग आहे. गाडीला डहाणू येथे ३ वाघिणी (डबे), उधवाडामध्ये २ आणि अमलसाडमध्ये १६ डबे लावण्याची व्यवस्था आहे. अशा २१ वाघिणी असलेली ही किसान रेल सुमारे २२ तासांत चिकू दिल्लीच्या बाजारपेठेत दाखल करते.

सर्वप्रथम गेल्या २७ जानेवारीला डहाणू रेल्वे स्थानकातून डहाणूचा चिकू थेट दिल्ली घेवून जाणारी किसान रेल्वे रवाना झाली होती. त्यावेळी ६ वाघिणींमध्ये ६० टन चिकू दिल्लीला पाठवण्यात आला होता. तेव्हाही ही गाडी २२ तासांत दिल्लीला पोहोचली होती. यावेळी डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही गाडी दिल्लीसाठी रवाना झाली होती.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात चिकूची लागवड करतात. तेथे सुमारे ५ हेक्टर क्षेत्रात पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामात २०० टन, तर इतर वेळी १०० टन चिकूचे उत्पादन होते.

आतापर्यंत चिकू ट्रकमधून इतरत्र पाठवला जात असे. त्यामुळे ते बाजारपेठेपर्यंत बऱ्याच उशिरा पोहोचत असे. त्यात काही प्रमाणात फळे खराबही होत असत. ती वाहतूक खर्चीकही आहे. मात्र आता किसान रेलमधून कमी खर्चात, कमी वेळेत फळाची कोणत्याही प्रकारची नासधूस न होता चिकू थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचत आहेत. शिवाय ५० टक्के अनुदान मिळत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे चिकू व्यापारी राजेश ठाकूर यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातून किसान रेल्वेसेवा दर सोमवार आणि गुरुवारी रवाना होणार आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही गाडी दररोज सुरू करता येते का तसेच वाघिणींची संख्या वाढविता येते का, याबाबत रेल्वेकडून आढावा घेतला जाणार आहे.

  • नीता चौरे, पालघर

………..

किसान रेल्वेतून पाठविण्यासाठी चिकूची प्रतवारी आणि पॅकेजिंग कसे केले जात आहे ते दाखविणारा व्हिडिओ सोबत दिला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply