रत्नागिरी जिल्ह्यात गटशेतीसाठी प्रायोगिक प्रकल्प – प्रसाद लाड

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठी समृद्ध असला तरीही त्याहीपलीकडे येथे शेतीचा विकाससुद्धा अधिक चांगला होऊ शकतो. हे लक्षात घेऊन गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथे गटशेती करण्यात येणार असून त्यासाठी ३ गट तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिंचखरीतील गटशेतीच्या विषयावर श्री. लाड यांची आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासमवेत बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिंचखरी येथे ४७५.८७ हेक्टरचे क्षेत्र असून २५ हेक्टरवर भातशेती, १२५ हेक्टरवर आंबा, ४२ हेक्टरवर काजूचे पीक घेतले जाते. तेथील १७ हेक्टरवर कांदळवन असून २२० हेक्टर क्षेत्र लागवडीस अयोग्य आहे. या भागात ७८ शेतकरी सामूहिक शेती करतात. त्यांना केंद्र सरकारच्या गटशेती योजनेचा फायदा मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न असून या शेतकऱ्यांचा २० चा १ गट याप्रमाणे गट करून त्यांना अवजारे, बियाणे तसेच जलसंवर्धन योजनेतून पाणी देण्यात येणार आहे. गावातील १२५ हेक्टरमध्ये भातपीक घेतले जाणार आहे. त्यातील अधिकाधिक भात शासनाने विकत घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असेही श्री. लाड यांनी सांगितले.

याच पद्धतीने मँगोनेटच्या माध्यमातून १२ हजार बागायतदारांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. एक जिल्हा एक उत्पन्न या योजनेखाली रत्नागिरी जिल्ह्यात आंबापिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील १२ हजार शेतकऱ्यांना एकत्र केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यकारी समित्यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रत्यन केला जाणार आहे. सध्या ५ हजार शेतकरी एकत्र आले आहेत, असे श्री. लाड यांनी सांगितले. जिल्ह्यात पिकणाऱ्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी अंत्योदयच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात भाजीपाला येत असला तरीही जेथे पिकत तेथे विकण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. या प्रयत्नांना मुंबई जिल्हा बँकेचे साहाय्य असेल. मुंबई जिल्हा बँक गटशेतीला ५ कोटी रुपये देणार असून रत्नागिरी जिल्हा बँकेच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी नाबार्ड, जलसंवर्धन तसेच सीएसआर निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

कोणत्या नदीचा गाळ काढावा, यासाठी लोकप्रतिनिधींचे मत विचारात घ्यावे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply