‘दर्दींच्या सोहळ्या’त झाले ‘सिंधुसाहित्यसरिता’चे प्रकाशन

आचरा (ता. मालवण) (ताराचंद पालव) : रामेश्वर हे तसे पाहिले तर साऱ्या सिंधुदुर्गाचेच ग्रामदैवत. रामेश्वराचे देऊळ नाही, असे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणे कठीण. मालवण-रत्नागिरी सागरी मार्गानजीक वसलेल्या कांदळगाव या टुमदार गावीदेखील असे रामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या निकट झाडांच्या गर्दीत लपलेल्या उमेश कोदे यांच्या घराच्या अंगणात ‘सिंधुअक्षर नगरीत’ रविवारी सायंकाळी (दि. ७ फेब्रुवारी) एक देखणा साहित्यिक सोहळा रंगला. ‘सिंधुसाहित्यसरिता’ नावाने सिद्ध झालेल्या एका संकलित पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ होता तो. ‘अक्षरगौरव सोहळा’ या नावाने तो आयोजित केला होता, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने.

‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आहे अनेक लेखांचा संग्रह. यातील सर्व लेख म्हणजे जिल्ह्यातील विविध लेखकांची शब्दचित्रे. वैशिष्ट्य असे की या सर्व व्यक्ती आपल्याला फारशा ठाऊक नसलेल्या, किंबहुना सामान्यांत राहून असामान्य कामगिरी केलेले आणि तरीही प्रकाशात न आलेले असे लेखक आणि अत्यंत उत्तुंग कार्य असूनही नव्या पिढीला ज्ञात नसलेले असे हे सगळे चरित्रनायक आहेत. विशेष म्हणजे ११२ पानांच्या या छोट्याशा पुस्तकात बावीस व्यक्तींची अल्प चरित्रे आहेत.

जुन्या चिरेबंदी वाड्याच्या कमानदार खिडकीतून दिसणाऱ्या नितांतसुंदर नदीपात्राचे दर्शन घडविणारे मुखपृष्ठ आणि ज्येष्ठ गजलकार मधुसूदन नानिवडेकर यांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तकाचे संपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि निवृत्त शिक्षक सुरेश ठाकूर यांनी केले आहे. श्री. ठाकूर यांनी ही शब्दचित्रे लिहिण्यासाठी कोणत्याही प्रथितयश लेखकाची मदत न घेता मालवण तालुक्यातीलच व्यक्तींना त्यासाठी प्रेरित केले, यापूर्वी कधीही लेखन न केलेल्यांनाही त्यांनी या कामासाठी प्रोत्साहित केल्याने साहित्य परिषदेसारख्या संस्थेची उद्दिष्टपूर्तीच झाल्याचा प्रत्यय येतो.

पुस्तकाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याने अल्पावधीतच दुसरी महत्त्वाची आवृत्ती काढणे आवश्यक ठरले. ‘अक्षरगौरव’ हा या दुसऱ्या आवृत्तीचाच प्रकाशन सोहळा होता. चक्रधरस्वामी स्मृतिदिनाचे औचित्य साधून कोमसापच्या मालवण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ झाला. कोमसापचे केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो, जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, निवृत्त प्रा. रवींद्र वराडकर, रामचंद्र वालावलकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. ‘सत्त्वश्री प्रकाशना’चे प्रमोद कोनकर व अनिकेत कोनकर यांजबरोबर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर हेही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू झाल्यावर पुस्तकासाठी लिहिणाऱ्या प्रत्येकाला मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती, त्या सोळाजणांची भाषणे, मान्यवरांची भाषणे आणि इतक्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. तरीही बरोबर ठरल्या वेळी सुरू झाल्याने नियोजित वेळेत हा कार्यक्रम पार पडला. पुस्तकातील लेखकांना सत्त्वश्री प्रकाशनतर्फे कोकण मीडियाचे पाच वर्षांचे दिवाळी अंक भेट देण्यात आले. या प्रत्येक अंकाला कोकणातील घटना-घडामोडींचा संदर्भ आहे. म्हणूनच लेखकांना साहित्यिक भेट देऊन औचित्य साधल्याचे अनिकेत कोनकर यांनी यावेळी सांगितले.

“हा गर्दीचा सोहळा नसून दर्दींचा सोहळा आहे,” अशा शब्दांत कार्यक्रमाचे नेमकेपण सुरेश ठाकूर यांनी स्पष्ट केले. लेखकांपैकी अनेकांच्या मनोगतात ‘आत्मविश्वास दिला’, कोणाला ‘आकाशवाणी’वर बोलण्याची संधी मिळाली, ध्वनिमुद्रण करण्याचा मान मिळाला, याबद्दल असलेल्या उल्लेखांमुळे साहित्याने काय दिले, यासारख्या प्रश्नांचे जणू उत्तरच मिळाले. कोणाला ओळखीची माणसे ‘लेखक’ म्हणून ओळखू लागली. करोनाकाळात ‘संकटात संधी’, वेतोबाच्या अथवा रामेश्वराच्या देवळात प्रकाशन झाल्यामुळे आपल्या श्रद्धेय दैवतानेच हे करवून घेतल्याची विनम्र जाणीवही अनेकांच्या मनोगतांमधून डोकावत होती. जीवन समृद्ध करणारा आनंदसोहळा असे काहींनी वर्णन केले. एखाद्या व्यक्तीची इतकी कमी माहिती मिळाली की, ती लिहिण्यास साडेतीनशे शब्द आणायचे कुठून?, तर कधी इतकी माहिती मिळाली की, ती साडेतीनशे शब्दांत बसवायची कशी? यासारख्या वाक्यांतून लेखकांचे परिश्रम आणि उमगलेपण प्रकट होत होते. फोन, पत्रांद्वारे अभिनंदनाचा आनंद, ‘या पुस्तकामुळे मी लेखक झालो’ हे समाधानही या नवोदितांनी बोलून दाखविले. राजेंद्र मसुरकर यांनीही सिंधुदुर्गातील साहित्यिक चळवळीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी ‘सर्वांच्या घरात आनंद फुलविणारा उपक्रम’ अशा शब्दांत या पुस्तक निर्मितीचे वर्णन केले. ‘चिऱ्यासंगतीने हिऱ्यासारखी माणसे जन्मली’ या कविवर्य वसंत सावंत यांच्या ओळी उद्धृत करून त्यांनी या लेखकांचा शाब्दिक गौरव केला.

अध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी अध्यक्षीय भाषणात या पुस्तकाचे संपादक श्री. ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. लिहिणारी माणसे श्री. ठाकूर यांनी गोळा केली, ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. कोमसापच्या मालवण शाखेचे साहित्यिक कार्य उत्कृष्ट चालू आहे. मधुभाईंना अपेक्षित असलेले काम या शाखेकडून पाहायला मिळते, याबद्द्ल सर्वांचे अभिनंदन, असे सांगून श्री. म्हस्के यांनी, जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये असणाऱ्या शिक्षक सभासदांची संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांना साहित्यिक पुरस्कारापासून वंचित राहावे लागते, ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्री. म्हस्के म्हणाले.

पुस्तकाचे प्रकाशक प्रमोद कोनकर म्हणाले की, सोळा जणांनी ज्यांच्याबद्दल लिहिले आहे, त्यांची पूर्ण चरित्रे सोळाजणांनी लिहावीत. ज्यांच्यावर लिहावे अशा सिंधुदुर्गात किमान दोनशे व्यक्ती आहेत. साहित्यात अनेक गोष्टी यायला हव्यात. प्रचलित घडामोडींचे, समस्यांचे आणि पर्यायाने या मातीचे शब्दचित्रण बदलत्या काळाच्या संदर्भात व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात मंदार सांबारी यांच्या स्वरचित ईशस्तवनाने झाली. चित्रकार, संगीतकार माधव गावकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सुरेश ठाकूर यांनी केले. गुरुनाथ ताम्हणकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. मधुरा माणगावकर यांनी आभार मानले. अक्षरगौरव कार्यक्रमाचे संयोजन सौ. अर्चना कोदे आणि कोमसापच्या सदस्यांनी केले. स्वराशा कासले यांनी गायिलेल्या पसायदानाने समारंभाची सांगता झाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply