रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ फेब्रुवारी) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे तीन रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एक, तर सिंधुदुर्गात दोघांच्या मृत्यूचीही नोंद आज झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एक (एकूण २), तर रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी, दापोली, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ आणि चिपळूण तालुक्यात ७ नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६५५ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १५५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७४ हजार ६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९१ आहे. त्यातील सर्वाधिक २८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३१ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१९१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१९ टक्के झाला आहे.
आज संगमेश्वर तालुक्यात ८८ वर्षे वयाच्या एका पुरुष रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५२ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (९ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ३ नवे करोनाबाधित आढळले, तर ६ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३०९ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९६७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कुंभारमाठ (मालवण) येथील ४५ वर्षीय, तर कुवळे (देवगड) येथील ६७ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १७० आहे.
Follow Kokan Media on Social Media

