रत्नागिरीच्या आदित्य लिमयेची शिवगान स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आज (९ फेब्रुवारी) पार पडली. स्पर्धेत आदित्य आनंद लिमये प्रथम आला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेची प्राथमिक फेरी आज, ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावर झाली. अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची स्पर्धा जिल्हा नगर वाचनालयात झाली. स्पर्धेत २४ जण सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. भाजप केवळ राजकीय कामकाज करत नाही, तर भारताचा वारसा जपण्याची अनेक कामेही पक्षाकडून केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांची थोरवी गाण्यासाठी शिवगान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भाजप महिला आघाडीच्या सौ. ऐश्वर्या जठार, भाजयुमो दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, भाजप शहर अध्यक्ष सचिन करमरकर, स्पर्धा समन्वयक आणि भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक आघाडी संचालिका प्रख्यात गायिका मुग्धा भट-सामंत उपस्थित होत्या.

स्पर्धेत छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारची गीते स्पर्धकांनी सादर केली. कोणतेही प्रवेश शुल्क नसलेल्या आणि करोनाविषयक शासकीय नियमांचे पालन करून झालेल्या या स्पर्धेत पहिले तीन आणि उत्तेजनार्थ दोन असे क्रमांक काढण्यात आले. हे विजेते असे – आदित्य आनंद लिमये, तन्वी मंगेश मोरे, सार्था नरेंद्र गवाणकर, उत्तेजनार्थ – स्वरदा उमेश लोवलेकर, अनुष्का देवरूखकर. स्पर्धेचे परीक्षण सौ. श्वेता हेरंब जोगळेकर आणि आनंद शंकर पाटणकर यांनी केले.

जिल्हा स्तरावरील प्राथमिक फेरीसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपयांची पहिली तीन पारितोषिके आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. मात्र त्यात वाढ करून अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि २ हजार रुपयांची पहिली तीन पारितोषिके तसेच उत्तेजनार्थ १००० रुपयांचे दिले जाणार आहे. प्रथम दोन क्रमांकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र करोनाविषयक नियमांमुळे केवळ प्रथम विजेत्याला राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. हा बहुमान रत्नागिरीत प्रथम आलेल्या आदित्य आनंद लिमये याला मिळाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply