रामराज्याची घटना ठरणारे ते साठ प्रश्न अभ्यासावेत – वझे

रत्नागिरी : रामराज्याची घटना ठरणाऱ्या त्या साठ प्रश्नांच्या आधारे रामायणाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष सी. ए. चंद्रशेखर वझे यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित कालिदास व्याख्यानमालेच्या समारोपाच्या व्याख्यानात ते आज ‘अज्ञात रामायण’ या विषयावर ते बोलत होते.

ते म्हणाले, रामायणाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता राम आणि भरत यांच्यातील संवाद महत्त्वाचा आहे. आजच्या काळातही हा संवाद खूपच उपयुक्त असून त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. रामाने राज्यकारभाराबाबत सूक्ष्म विचार केलेला दिसतो. राज्य हडप करण्याची इच्छा असणार्याा मंत्र्यांना आणि भ्रष्ट आचरण करणार्यां ना थारा करू नका, असा स्पष्ट आदेशच रामाने भरताला केला होता. त्यामुळे आजच्या काळातसुद्धा वाल्मीकी रामायण उपयुक्त ठरते.

राम आणि भरताच्या भेटीवेळी रामाने भरताला राज्यकारभार, न्याय, संरक्षण याविषयी अनेक प्रश्ना विचारले आहेत, सूचना दिल्या आहेत. ज्ञानी पुरोहितांचा सन्मान करतोस का, पितासमान वृद्धांचा मान राखतोस का, शूरवीर, शास्त्रज्ञ, अभ्यासू मंत्री नेमले आहेस का, शास्त्रनिपुण अमात्यांची नियुक्ती केलीस का, अवेळी झोप घेतोस का, रात्रीच्या पहिल्या प्रहरात उद्याचे नियोजन करतोस का, अपराध्यांना योग्य शिक्षा होते ना, कारण निरपराध लोकांचे अश्रू राजवंशाचाही नाश करतात. शिक्षासुद्धा गुन्ह्याच्या प्रमाणात असावी, असे सुमारे ६० प्रश्न रामाने विचारले असून काही सूचनाही केल्या आहेत. ते प्रश्न म्हणजे रामराज्याची घटनाच म्हणावी लागेल, असे सीए चंद्रशेखर वझे म्हणाले.

रामाने विचारलेले हे प्रश्ना आजच्या काळालाही लागू होणार आहेत. समाजहिताचे प्रकल्प द्रुतगतीने पूर्ण होतात ना, या विचारामध्ये पैसे आणि वेळेला महत्त्व दिले आहे. हेर खाते सज्ज असावे. आधी मंत्र्यांशी चर्चा करावी, नंतर सर्व मंत्रिमंडळात विषय मांडावा, आपल्या गोपनीय गोष्टी दोघांमध्ये स्थिर राहतात. पण तिसऱ्याला कळल्या तर पसरण्याची भीती असते. आपल्या देशाचा आणि विद्वान, सदसद्विवेक बुद्धी असलेला राजदूत नेमावा. सैनिकांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, तरच त्यांची राज्याशी निष्ठा चांगली राहते, असे रामाने भरताला सांगितले होते, असे श्री. वझे म्हणाले.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारणीचे काम चालू आहे. त्याला लोक सढळ हस्ते निधी देऊन हातभार लावत आहेत. त्याप्रमाणे मूळ वाल्मीकी रामायणातील रामराज्याची संकल्पना अभ्यासून समाजात रामाचे विचार पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे. काही सर्गांवर विद्यार्थ्यांनी शोधनिबंध लिहावा, असे आवाहन सीए वझे यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी श्री. वझे यांच्या रामायणावरील विवेचनाबद्दल अभिनंदन केले. संस्कृत विभाग सातत्याने चांगले उपक्रम राबवत आहे. रामराज्य अवतरण्यासाठी रामाचा विचार समाजात पोहोचवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा शिवलकर यांनी केले. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply