`दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी (२० फेब्रुवारी) बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्रींना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत मंत्रालय, विधिमंडळ, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि अन्य शासकीय, निमशासकीय जिल्हा आणि तालुका येथील शासकीय कार्यालयांमधून जांभेकर यांना अभिवादन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याकरिता शासनातर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अधिकृत छायाचित्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात विराजमान असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. हे तैलचित्र सुप्रसिद्ध चित्रकर्ती सौ. चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले आहे.

या तैलचित्राचा यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर १९८५ मध्ये SOCIAL REFORMERS OF MAHARASHTRA या नावाचे प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. ते पुस्तक माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आले असून ते कॉपीराइट करण्यात आले आहे. हे पुस्तक तयार करण्याची जबाबदारी सुप्रसिद्ध साहित्यिक दिवंगत य. दि. फडके यांच्यावर सोपविली होती. या पुस्तकासाठी महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांची चित्रे तयार करून देण्याचे काम सौ. चंद्रकला कुमार कदम यांच्यावर सोपविले गेले होते. त्यासाठी त्यांना आवश्यक ती संदर्भयुक्त माहिती पुरविण्यात आली होती. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर तसेच इतर समाजसुधारकांची तैलचित्रे दिवंगत फडके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती. त्या छायाचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेही हे छायाचित्र आहे. ते छायाचित्र त्यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे नियुक्त केलेल्या समितीने अधिकृत म्हणून मान्य केलेले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून संघातर्फे शासनाला धन्यवाद दिले आहेत. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयातदेखील जांभेकर यांना अभिवादन करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

……
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती २० फेब्रुवारीला

राज्यभरात दरवर्षी सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो. शासनासह बहुतेक सर्वच ठिकाणच्या जिल्हा पत्रकार संघांमध्ये सहा जानेवारी म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याचा उल्लेख केला जातो. अनेक ठिकाणी तो चुकीचा असल्याचे वारंवार सांगूनही त्यात बदल होत नाही. मात्र राज्य शासनाच्या महापुरुषांच्या यादीमध्ये आता २० फेब्रुवारी ही बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले आहे. त्यामुळे यापुढे सहा जानेवारी हा केवळ बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथम प्रसिद्ध केलेल्या दर्पण या मराठी वृत्तपत्राची आठवण म्हणून पत्रकार दिन साजरा केला जाईल आणि २० फेब्रुवारीला शासकीय स्तरावर जयंती साजरी केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

….
चंद्रकला कदम यांची चित्रकारी
सौ. चंद्रकला कुमार कदम या सुप्रसिद्ध चित्रकर्ती असून त्यांनी भारतीय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आलेले स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे तैलचित्र तसेच महाराष्ट्र विधान भवनातील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, दादासाहेब मावळंकर, यशवंतराव चव्हाण, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, एस. एम. जोशी, गुजरात विधानसभेतील स्वा. वि. दा. सावरकर, मुंबई उच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, मौलाना अबूल कलाम आझाद, लोकमान्य टिळक, सी. डी. देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ, शंकर दयाळ शर्मा आदींची तैलचित्रे तयार केली आहेत. नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका, नांदेड-वाघाळा महापालिका, पिंप्री-चिंचवड महापालिका, नाशिक महापालिका, इचलकरंजी नगरपालिका आदी संस्थांसाठी मान्यवरांची तैलचित्रेही सौ. कदम यांनीच तयार करून दिलेली आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्य सभागृहासाठीही भव्य तैलचित्रे नुकतीच तयार करून दिली आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply