रत्नागिरीत २३, सिंधुदुर्गात ५ नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ फेब्रुवारी) करोनाचे नवे २३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ रुग्ण आढळले. रत्नागिरीत २ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज एकही रुग्ण बरे होऊन घरी जाऊ शकला नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. सर्व रुग्ण आरटीपीसीआर चाचणीनुसार निश्चित झाले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी ५, खेड ९, चिपळूण २, संगमेश्वर ७. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७८७ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७५ हजार ३४२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०७ आहे. त्यातील सर्वाधिक १९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२९१ झाली आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असल्याने करोनामुक्तीचा दर घटला असून तो आता ९४.९३ टक्के आहे. जिल्ह्यात आज नव्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची एकूण संख्या ३५८ एवढीच असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१८ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ५ करोनाबाधित आढळले, तर आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३८० झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०२९ एवढीच राहिली आहे. सध्या जिल्ह्यात १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply