अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे आनंद आणि समृद्धी

चिपळूण : व्यक्तीच्या मनाला नम्रता शिकविणारा, भूमीशी सायुज्य साधणारा, लक्ष्मीला प्रसन्नचित्ताने निमंत्रण देणारा, आनंद नि समृद्धीचा अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने शेतीतून श्रमसंस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, अर्थक्रांती घडविणारा ठरला आहे, असे गौरवोद्गार लोटे (ता. चिपळूण) येथील कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी काढले.

मांडवखरी (ता. चिपळूण) येथे महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या अन्नपूर्णा प्रकल्प क्षेत्रीभेटीच्या निमित्ताने ते बोलत होते. कंपनीने मांडवखरी येथील श्रीकाळकीदेवी महिला शेतकरी गटाला सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्याचा हात देऊ केला आहे. दिशान्तर संस्थेच्या साथीने या महिला शेतकऱ्यांनी सहकारातून सामुदायिक शेती, सेंद्रिय शेती उत्पादनांची दलालमुक्त विक्री व्यवस्था निर्माण करून समूह शेतीतून चांगले उत्पादन मिळविले आहे. व्यावसायिक अळंबी उत्पादनदेखील सुरू केले आहे. एका स्वतंत्र वास्तूत स्वच्छता आणि सुरक्षिततेची सर्व मानके जपत उत्तम दर्जाचे अळंबी उत्पादन सुरू आहे. याच जोडीने घरोघरी समृद्ध परसबाग ही संकल्पना साकारताना विविध फळझाडे, वनस्पती, भाजीपाला, वेलवर्गीय फळभाज्यांमधून निरामय जीवनाचे सूत्र सांभाळण्यात येत आहे. विशेष म्हणजे करोना आपत्ती काळात या परसबागांनी तेथील प्रत्येक कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला, फळे आणि इतर खर्चासाठी पैसे मिळवून दिले. वैयक्तिक स्तरावर महिलांनी परसबाग आणि मसाले पिकातून आपल उत्पन्नात सातत्याने वाढ सुरूच ठेवली आहे.

या प्रक्रियेला बळ देताना कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स कंपनीने दिशान्तर संस्थेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना शेती अवजारे, वैविध्यपूर्ण प्रकारचे शेती प्रशिक्षण, अभ्यास सहली, बी-बियाणे, सेंद्रिय खतनिर्मिती, परसबागा समृद्ध करण्यासाठी शेकडो फळझाडे, वनस्पती, इतर खर्चासाठी गटाला अर्थसाह्य, पॉवर टिलर, पंप अशा विविध माध्यमातून सहकार्याचा हात देऊ केला. महिला शेतकऱ्यांनीही अपार कष्ट, दुर्दम्य ध्येयासक्तीने काम केले. दोन वर्षांपूर्वी झालेल प्राथमिक चर्चेच्या वेळी उपस्थित महिला शेतकरी ते आता प्रकल्प सक्षमपणे उभा ठाकत असतानाचा त्यांच्यातील बदल ठळकपणे दिसत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.

महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम अन्नपूर्णा प्रकल्पाने केले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो, असे कंपनीचे लोटे-आवाशी येथील मनुष्यबळ व्यवस्थापक अमोल देवकर यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी मोकळेपणाने कंपनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव, कंपनीचे नंदन सुर्वे यावेळी उपस्थित होते. संस्था आणि गटातर्फे कंपनीच्या अधिकाऱ्यांना मानपत्र, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply