रत्नागिरी-सिंधुदुर्गात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (१८ मार्च) करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २८ रुग्ण आढळले, तर केवळ ६ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात १८ नवे रुग्ण आढळले, तर केवळ ३ करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि चिपळूण प्रत्येकी ७, खेड ८, संगमेश्वर आणि मंडणगड प्रत्येकी १ (एकूण २४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार दापोली १ आणि खेड ३ (दोन्ही मिळून २८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २९८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४६३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९० हजार १७५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११९ आहे. त्यातील सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ५९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ७७२ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.८९ टक्के आहे.

जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७० असून आज एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांचा आकडा ३७० एवढाच असून मृत्युदर ३.६० टक्के आहे.३.६१ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या करोनाविषयक अहवालानुसार आज ३ रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ६ हजार २८४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६५२ एवढी झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७८ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

करोनाप्रतिबंधक लसीकरण अल्प प्रमाणात – नीतेश राणे


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या करोनाप्रतिबंधक ४० हजार लशींमधून केवळ १४ हजार जणांना लस देण्यात आली आहे. बाकी २६ हजार लशी विनावापर पडून आल्याची टीका आमदार नीतेश राणे यांनी आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्याला मिळालेल्या ५३ लाख लशींपैकी फक्त २३ लाख जणांना लस देण्यात आली असून उर्वरित ३० लाख जणांचे लसीकरण केव्हा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संसदेत शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत आपल्या जिल्ह्यात शिल्लक २६ हजार लसीकरण करण्याचे काय नियोजन करणार आहेत, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग याचे काय उत्तर देणार आहेत, असा सडेतोड सवाल आमदार नीतेश राणेंनी केला.

महाराष्ट्रात करोनाप्रतिबंधक लशींचा तुटवडा असल्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दाव्याची आमदार नीतेश राणेंनी चांगलीच चिरफाड केली. आधी शिल्लक राहिलेल्या ३० लाख लशींचे काय ते नियोजन करा. उद्या होळी सणासाठी चाकरमानी आल्यानंतर करोना प्रादुर्भाव वाढल्यास राज्यातील सत्ताधारी केंद्रावर ठपका ठेवणार. पण दिलेल्या लशी कधी वापरात आणणार, हा प्रश्न आहे. हा सरकारचा नियोजनशून्य कारभार असल्याची टीका आमदार नीतेश यांनी केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply