पाच हजार मुलाखती घेणारे सिनेपत्रकार अशोक शेवडे यांचे निधन

डोंबिवली : प्रख्यात मुलाखतकार अशोक शेवडे (७७) यांचे अल्प आजारामुळे आज, गुरुवारी सकाळी डोंबिवलीत निधन झाले. पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी त्यांची ख्याती होती.

देशभरातील नामवंत साहित्यिक, चित्रपट दिगदर्शक, लेखक, कवी, शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या. स्टेट बँकेतून व्हीआरएस घेऊन नंतर त्यांनी पूर्णपणे मुलाखत घेण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. जुन्या काळी दूरदर्शनवर दर शुक्रवारी त्यांची विशेष व्यक्तिमत्त्वासोबत मुलाखत कार्यक्रम होत असे

सुरुवातीला मुंबईत गिरगावातील सोमण बिल्डिंगमध्ये राहणारे अशोक शेवडे कालांतराने डोंबिवलीत राहायला आले. समाजातील विविध चांगल्या गोष्टी हेरून त्या दूरदर्शन अथवा रेडिओ आदी माध्यमातून जगासमोर आणून त्या कार्याचा प्रचार, प्रसार करण्याचा कार्यक्रम त्यांनी आजीवन केल्या. समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना त्यांनी प्रकाशझोतात आणले. बरेच दिवस त्यांना आर आर हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

……
आठवला सत्तरीच्या दशकाचा काळ
सिनेमा आणि नाट्यपत्रकार, निवेदक अशोक शेवडे यांच्या निधनाचे वृत्त आले (१८ मार्च २०२१) आणि माझे मन एकदम सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात गेले. मी गिरगावातील गावदेवीच्या भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना राजेन्द्र खांडेकरशी माझी छान मैत्री झाली आणि समजले की अशोक शेवडे त्याच्या मोठ्या बहिणीचे पती. अगदी घरातील नाते. मी त्यावेळी रसरंग, चित्रानंद, मार्मिक, सोबत इत्यादी साप्ताहिकांतून पत्रलेखन करत असे. त्यापैकी चित्रानंद साप्ताहिकात अशोक शेवडे यांचे ‘ओळखीचे चेहरे’ हे सदर असे. मराठी व हिंदी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारत असलेल्या कलाकारांची मुलाखतवजा माहिती ते त्यात देत. त्या काळातील माझ्यासारख्या सिनेमाव्यसनीना अशा छोट्या छोट्या भूमिका साकारत असलेल्या कलाकारांबाबत प्रचंड उत्सुकता असे. त्यामुळे हा कॉलम वाचनीय होता. प्रत्येक आठवड्यात एक चेहरा आणि माहिती समोर येई.

राजूच्या अर्थात राजेन्द्र खांडेकर) मंगल वाडीतील घरी माझे येणे-जाणे वाढता वाढता त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी परिचय घट्ट होत गेला. अशोक शेवडे मार्मिक इत्यादी साप्ताहिकातही अधूनमधून लिहीत. चित्रानंदमधील त्यांनी घेतलेली अभिनेत्री आशूची मुलाखत गाजली होती. आपली बँकेतील नोकरी सांभाळून ते लेखन करत. चित्रानंदसाठी ते कव्हर स्टोरी अथवा एकादा विशेष लेखही लिहीत. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभाव पाडणारे असेच होते. छान उंची, अनेकदा झब्बा आणि चटपटीत बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य. (मनोरंजन क्षेत्रातील पत्रकार असाच असावा. पण ते मूळ व्यक्तिमत्त्व हवे.) राजूच्या घरी अधूनमधून त्यांच्या भेटी होत, तेव्हा मी फारच बुजरा होतो. त्यामुळे जुजबी बोलणे होई. ते मात्र मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक गोष्टी सांगत.

एकदा दत्ता भट्ट परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत व्ही. रवींद्र दिग्दर्शित ‘सौभाग्यदान’ या चित्रपटाचे शूटिंग करीत असताना त्यांच्याकडून फोटो आणण्यासाठी मी राजूसोबत गेलो. अशोक शेवडे यांनी त्याला ते सांगितले होते. आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटाच्या स्टुडिओत आपण जातो आहोत आणि तेदेखील चित्रपती व्ही. शांताराम यांच्या स्टुडिओत जातो आहोत, याचा मला विलक्षण आनंद झाला. एकदा त्यांनी मला कोहिनूर थिएटरमध्ये (आताचे नक्षत्र) ‘भैरू पैलवान की जय ‘ (१९७८) हा चित्रपट पाहून रसरंगमध्ये ‘प्रेक्षकांच्या चष्म्यातून’ या वाचकांच्या सदरासाठी लिही, असे सांगतानाच दोन तिकिटेही दिली. एक माझ्यासाठी तर दुसरे तिकीट राजूचा भाचा आनंद याच्यासाठी होते. या चित्रपटात यशवंत दत्त, अरुण सरनाईक, उषा चव्हाण, उषा नाईक इत्यादींच्या भूमिका आहेत. (अशा प्रकारेही चित्रपट प्रसिद्धीत भर पडत असते, हे कालांतराने माझ्या लक्षात आले.) त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी मला प्लाझा थिएटरमध्ये ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ( १९७९) हा चित्रपट पाहून त्यावर काय ते मला सांग, म्हणाले. त्यानुसार मी केल्यावर त्यांनी माझ्याकडून माझा फोटोही मागून घेतला आणि चित्रानंदमध्ये त्यांनी ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या चित्रपटावर विविध क्षेत्रातील पाच जणांची मते, असा दोन पानी लेख लिहिताना सोबत फोटोही प्रसिद्ध केला. यातून एकीकडे माझी भीड चेपली जात होती, तर दुसरीकडे मी पत्रकारितेकडे जात होतो. (अभ्यासात माझे फारसे लक्ष नव्हते. आमच्या खोताची वाडीच्या कोणत्याही बाजूने बाहेर पडलो की रस्ता सिनेमा थिएटरकडे जातो, एवढेच मला माहीत होते. राजू मात्र अभ्यास आणि कॉलेजची एकांकिका या दोन्हीत रस घ्यायचा.)

अशातच एकदा अशोक शेवडे यांचा मजकूर घेऊन राजू चित्रानंदच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असताना मलाही घेऊन गेला (प्रभादेवीला भिखू बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर ते होते.) तेव्हा पहिल्यांदा मी इसाक मुजावर यांना पाहिले. लहानपणापासून रसरंगमध्ये ज्यांचे ‘फ्लॅशबॅक’ सदर वाचतोय आणि मग चित्रानंदचे ते संपादक झाले, तेच हे! याचा मला विलक्षण आनंद झाला. सत्तरच्या दशकात चित्रपटावरचे लेखन म्हटले की, इसाक मुजावर, वसंत साठे, वसंत भालेकर, शिरीष कणेकर, सुधीर नांदगावकर, विजय नाफडे ही नावे हुकमी. यातच आणखीन दोन नावे होती, मदन शारंगपाणी आणि बाळकृष्ण दांडेकर. एकदा शेवडेंना मी या दोघांबद्दल विचारले असता ते म्हणाले, ती इसाक मुजावरांची टोपणनावे आहेत. अशातच १९८२ च्या फेब्रुवारीत अशोक शेवडेंनी राजूसोबत मला मुजावर यांना भेटायला पाठवले. यावेळी कारण वेगळे होते, मी चित्रानंदमध्ये कामाला लागावे, अशी अशोक शेवडेंची इच्छा होती आणि मुजावरना मी चित्रानंदमध्येही पत्रलेखन करीत होतो, अधूनमधून एकादा लेख पत्राने पाठवायचो तसाच तो अधूनमधून प्रसिद्ध होतोय, म्हणून माहीत होतोच. मलाही प्रत्यक्षात मीडियात पाऊल टाकण्याची संधी मिळाली. पण दोनच महिन्यांत मी नवशक्तीत प्रूफरीडर म्हणून रुजू झालो आणि मग चित्रानंदमध्येही अधूनमधून काम करायचो आणि लिहायचोही…. मी नवशक्तीत रुजू होतोय हे मी सात रस्ता येथील बँकेत जाऊन अशोक शेवडेंना सांगितले, तेव्हा त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार कर म्हटले. पण मी पुढचा विचार केला.

त्यानंतर कधी रमेश देव यांच्या एखाद्या चित्रपटाच्या मुहूर्ताला अथवा एकाद्या चित्रपटाच्या संदर्भात अशोक शेवडेंची भेट व्हायची. शेवडेंची वाटचाल इतरांपेक्षा वेगळी होती. आम्ही इतर सिनेपत्रकार मराठी चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टिंगसाठी कोल्हापूर, पुणे, गोव्याला जायचो, तेव्हा आमच्यात शेवडे नसत. पण त्यांचा स्वतंत्रपणे धडाका कायम होता. चंदेरी सोनेरी नावाचा मनोरंजक कार्यक्रम करत त्यांची वाटचाल सुरू होती. अधूनमधून त्यांचा फोन यायचा. अमूक लेख वाचला म्हणायचे. दरम्यान, राजेंद्र खांडेकरचे १९९६ साली औरंगाबादला अपघाती निधन झाले, तर त्याचा भाऊ अनिल खांडेकरने मराठी चित्रपटसृष्टीत कॅमेरामन म्हणून सुरुवातीला सहाय्यक आणि मग स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली. त्यामुळे त्याच्याशी सतत संवाद असतोच. अगदी आजही अशोक शेवडेंच्या निधनाचे वृत्त समजताच त्यालाच फोन केला आणि हा सगळा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर आला.

  • दिलीप ठाकूर, मुंबई
  • (सिनेपत्रकार)
  • (98706 16216)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply