रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक लाख क्विंटल भात विकावे – माने

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी किमान एक लाख क्विंटल भात विकले पाहिजे, अशी अपेक्षा रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

तालुका खरेदी-विक्री संघाने पुढाकार घेतलेल्या भातविक्रीला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने भाताला क्विंटलला एक हजार ८६८ रुपये इतका भाव जाहीर केला असून राज्य सरकारने प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भाताला प्रतिक्विंटल दोन हजार ५६८ रुपये मिळणार आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. रत्नागिरी तालुक्यात तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर भातखरेदी करत आहे. त्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आपले जास्तीचे भात विकायचे असेल तर त्यांनी ते जिल्हा खरेदी-विक्री संघ तसेच तालुका खरेदी-विक्री संघामध्ये द्यावे, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे. भात खरेदी-विक्रीसाठी संबंधित शेतकऱ्यांच्या सातबाराची ऑनलाइन नोंदणी केली जाते. त्यानंतर भातखरेदी केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २० हजार टन एवढीच भातखरेदी झाली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही खरेदी चालू राहणार आहे. मात्र १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी आपला प्रयत्न असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

दरम्यान, भाताचे नवनवीन बियाणे कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित झाले आहे, ते वाण वापरले तर शेतकऱ्याचे उत्पादन वाढू शकते. तसेच शेतकऱ्यांना येत्या हंगामात चांगले बियाणे, खते शेतकऱ्यांच्या बांधावर मिळावीत, यासाठी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचेही श्री. माने म्हणाले.

गेल्या खरीप हंगामात ६५ हजार हेक्टर भातशेती करण्यात आली. करोनामुळे गावी अडकून पडलेल्या चाकरमान्यांची त्याकरिता मोठी मदत झाली. यावर्षी ३ लाख टन उत्पादन घेतले आहे, ही कौतुकाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे उत्पन्न दुप्पट व्हावे, याकरिता सुधारित भातबियाणे वापरले पाहिजे आणि क्षेत्रसुद्धा वाढवले पाहिजे, असे आवाहनही श्री. माने यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply