मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक उभारण्याची मागणी

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईतील काळबादेवी भागात भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य शासन व मुंबई महापालिकेने उभारावे. तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र होणाऱ्या विद्यापीठाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ असे नाव द्यावे, अशी मागणी करणारा विशेष ठराव महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाने केला आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची छत्तिसावी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाची चाळिसावी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा फलटण (जि. सातारा) येथे झाली. त्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ होते. ऑनलाइन पद्धतीने ही वार्षिक सभा झाली. राज्य शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी १० कोटींची तरतूद केली. तसेच ‘दर्पण’कार आचार्य जांभेकर यांच्या पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) या जन्मगावी संस्थेने उभारलेल्या स्मारकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी तसेच रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका विशेष ठरवान्वये अभिनंदन करण्यात आले. त्याला अनुसरून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सध्याच्या ११ हजार रुपये प्रतिमहिना मानधनात वाढ करून प्रत्येकी २० हजार रुपये मानधन १ एप्रिल २०२१ पासून देण्यात यावे, त्यासाठी आणखी जादा १५ कोटींची तरतूद पावसाळी अधिवेशनातील पूरक मागण्यांमध्ये करण्यात यावी. करोनाच्या काळात करोनाविरुद्धच्या लढ्यात करोना योद्धे म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणीही राज्य शासनाकडे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून रवींद्र बेडकीहाळ यांनी केली.

करोनाच्या काळात आणि सध्याही अनेक निर्बंधांमुळे राज्य शासनाच्या शासनमान्य जाहिरात यादीवरील क वर्गातील जिल्हा दैनिके, साप्ताहिके यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी या वृत्तपत्रांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ३ लाखाचे पॅकेज जादा जाहिरातींची तरतूद करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघातर्फे कार्यलक्षी संचालक अमर शेंडे यांनी विषयपत्रिका वाचून आर्थिक पत्रके आणि कार्य अहवाल सादर केला. या सभेसाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त गोविंद बेडकिहाळ, गजानन पारखे, अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ तसेच संपादक सहकारी संघाचे बाळासाहेब आंबेकर, अॅड. रोहित अहिवळे, विनायक खाटपे, भाऊसाहेब नलावडे, प्रसन्न रुद्रभटे यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply