रत्नागिरी : ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने प्रयत्नपूर्वक जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील आशादीप या विशेष मुलांच्या कार्यशाळेला लोखंडी कपाट भेट देण्यात आले.
लॉकडाउन आणि करोना विषाणूच्या महामारी काळात घरोघरी जिवाची बाजी लावत महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरू ठेवला. त्यामुळे सामान्य माणूस घरी सुखाने राहू शकला होता. पाणी, मोबाइल, टेलिव्हिजन किंवा वर्क फ्रॉम होम हे सर्व शक्य झाले वीजपुरवठा सुरू असल्याने. परंतु या वापरलेल्या विजेचे बिल वसूल करताना वीज कामगारांना नाइलाजास्तव कठोर भूमिका घ्यावी लागली होती. ती घेतानाही कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची आपली भावना सतत जागृत ठेवली आहे. करोनाच्या काळात विविध गरीब वस्त्यांमध्ये धान्य वाटप, कोविड सेंटरसाठी गरम पाण्यासाठी बाटल्या देणे, वृद्ध, एकाकी महिलेला स्वखर्चाने वीजपुरवठा सुरू करून देणे, त्या गरीब महिलेचे एक वर्षाचे वीज बिल भरणे अशी सामाजिक कामे या कर्मचाऱ्यांनी केली आहेत. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील आशादीप विशेष मुलांच्या संस्थेला लोखंडी कपाट आवश्यक असल्याचे समजल्यावर रत्नागिरी ग्रामीण उपविभागातील उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक पातळीवर वर्गणी गोळा करून एक लोखंडी कपाट कार्यकारी अभियंता रामलिंग बेले यांच्या हस्ते प्रदान केले. श्री. बेले यांनी आशादीप संस्थेच्या कार्याची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. भविष्यातही संस्थेला मदत करू, असेही आश्वासन दिले.
यावेळी ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. डांगे, चाफे येथील उपकार्यकारी अभियंता मंगेश पाटील आदी अधिकारी-कर्मचार उपस्थित होते. आशादीप संस्थेचे संचालक दिलीप रेडकर यांनी महवितरण कंपनीचे आभार मानले. संस्था नवीन इमारत बांधणार आहे. त्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
