रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या महिनाअखेपर्यंत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंतही जाऊ शकते. ते लक्षात घेता आज रात्रीपासून राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (१४ एप्रिल) सायंकाळी झूम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी घरीच बसावे, असे आवाहन त्यांनी केले.

तपासण्या वाढविल्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाच हजारापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे. अत्यावश्यक सेवेसाठी काही सवलती दिल्या आहेत. खाद्यपदार्थ, भाजीची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र त्यांना घरपोच सेवा देता येणार आहे. तसेच ज्या व्यापार्यां्ना होम डिलिव्हरी देता येत नाही, त्यांना संपूर्ण चाचणी करून परवानगी घेऊन आळीपाळीने दुकाने उघडी ठेवता येतील का, याबाबत विचार सुरू आहे. होम डिलिव्हरी करणार्यांघकडे परवानगीचे स्टिकर असणे बंधनकारक आहे. बांधकाम व्यवसायावरही बंधने घातली आहेत. पावसापूर्वीच्या कामांनाच परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो अधिकृत ठेकेदार असणे अनिवार्य आहे. बांधकाम कामगारांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी त्यांची चाचणी करून काम सुरू ठेवता येणार आहे. पॅकिंगशी निगडित काही उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. तर काही ५० टक्के कामगारांच्या उपस्थितीला उद्योग सुरू ठेवले जाणार आहेत. मात्र त्यांची चाचणी बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

रेस्टॉरंट, बार, हॉटेलना होम डिलिव्हरीची मुभा आहे. वडापावच्या गाड्या बंद राहतील. भाजीपाल्यासाठी एक ठिकाण निश्चि,त करून त्या त्या वॉर्डमध्ये विक्रीची सवलत दिली जाईल. शॉपिंग सेंटर, मॉल सर्व बंद राहील. सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालये, खासगी क्लासेस, सलून, स्पा बंद राहतील.

जिल्ह्यातील वाढत्या करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षीप्रमाणेच कडक निर्बंध लागू केले आहेत. याबाबतची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, जनतेने घरी बसावे. कोणीही रस्त्यावर फिरू नये. अगदी अत्यावश्यक सेवेतील लोकांना आवश्यकतेनुसार फिरायला परवानगी राहील. जीवनावश्यक वस्तू घरपोच द्यावी. हेल्पिंग हॅण्ड, पोलीस मित्र, तसेच विविध संस्थांचे सहकार्य जिल्हा प्रशासनाने घेतले आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल मिळणार असून इतरांना इंधनाचा पुरवठा करण्यात येणार नाही. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंपही बंद करण्यात आले आहेत. प्रत्येकानेच खबरदारी घेऊन गरज नसताना बाहेर पडू नये. ज्या कामासाठी नागरिक बाहेर पडणार असतील, त्यांनी त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत. ती नसतील, तर कोणालाही रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. पंचवीस माणसांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी असली, तरी हे समारंभही होऊ नयेत, असे आदेश जिल्हा प्रशासन देणार आहे. जिल्ह्यात येणार्याय प्रत्येकाची करोना चाचणी बंधनकारक आहे. चाचणीनंतरच प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात उद्यापासून कोणालाही अत्यावश्यक सेवा किंवा महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सीमांवर तसेच रेल्वे, बसस्थानक येथेही प्रवाशांची तपासणी होईल.

दुकानांमध्ये तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, दूरवरून प्रवास करून घरकाम करणाऱ्या महिलांनी करोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात जेथे किराणामालाची जवळ जवळ दुकान आहेत, ती एक दिवसआड सुरू करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यातील प्रवेशद्वार असलेल्या महत्त्वाच्या भागात प्रवेश करताना कडक तपासणी होणार आहे. कशेडी घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट या ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असून प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. मुंबईतून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी कशेडी घाटात सीसीटीव्ही कॅमेरा ठेवण्यात आला असून त्यांची करोना टेस्ट झालेली असणे बंधनकारक राहणार आहे. ती झालेली नसेल, तर तेथेच ती टेस्ट करून घेतली जाईल. शासकीय कार्यालयात पन्नास टक्के उपस्थिती राहणार असून नागरिकांसाठी सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.

वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगून गरज नसताना कोणीही घरा बाहेर पडू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply