रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिलेल्या माहितीची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकाला भेट दिली. कोकण रेल्वेतून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या करोना तपासणीच्या नियोजनाबाबत आढावा त्यांनी घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदीचे कडेकोट पालन सुरू झाले आहे. जिल्ह्याबाहेरून महामार्गाने किंवा कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले होते. सर्व रेल्वेस्थानकांवर आरोग्य पथक सज्ज असेल. प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला स्थानकाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढलेल्या मुंबईतून कोकण रेल्वेने जिल्ह्यात परतणाऱ्या साऱ्यांचीच चाचणी केली जात नसल्याचे काल (दि. १५ एप्रिल) सकाळी ११ वाजता कोकण मीडियाच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा स्पष्ट झाले. मुंबईहून जनशताब्दी एक्स्प्रेसमधून सुमारे शंभर प्रवासी काल रत्नागिरी स्थानकात उतरले. पण केवळ १३ जणांनी स्वतःहून नोंदणी केली. हे प्रवासी रत्नागिरी शहर, पावस, कारवांचीवाडी इत्यादी परिसरातील होते. इतर सर्व प्रवासी कोणत्याही तपासणीविना स्थानकातून निघून गेले. तपासणीच्या कक्षात केवळ एक कर्मचारी होता. प्रवाशांना तपासणी कक्षाकडे नेण्यासाठी कोणताही कर्मचारी नव्हता. प्रवाशांची तपमानासारखी प्राथमिक चाचणीही केली जात नव्हती. प्रवासीही त्या कक्षाकडे फिरकत नव्हते. दरम्यान, काल सायंकाळी फेसबुक लाइव्हमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी रेल्वे स्थानकावर आजपासून पथक कार्यरत होणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज, १६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताही त्या स्थितीत फरक झाला नव्हता. चाचणी कक्ष प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी हलविण्यात आला आहे. प्रवाशांनी रांगेत येऊन माहिती द्यावी, यासाठी जमिनीवर चिकटपट्ट्या लावण्यात आल्या. मात्र आजही पीपीई किट घातलेला एकच कर्मचारी कक्षात उपस्थित होता. आज सकाळपासून सुमारे ७० प्रवासी आले. त्यापैकी १६ जणांनी नोंद केली. त्यापैकी दोघांनी अँटिजेन टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. नोंद केलेल्या बाकीच्या १४ जणांनी केली नव्हती. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत व्हॉट्स अॅपवर आजही देण्यात आली. त्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांनी स्वतः सायंकाळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये उपस्थित होते. बैठकीत ठरल्यानुसार कोकण रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येबाबतची माहिती कोकण आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेला दिली जाणार आहे. त्या सर्व प्रवाशांची करोनाविषयक रॅपिड अँटिजेन तपासणी स्थानकामध्येच करण्यात येणार आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तपासणी पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. त्यासाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ इतर कर्मचारी अशा ३ कर्मचाऱ्यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक रत्नागिरी रेल्वे स्थानकात दररोज २४ तास कार्यरत असणार आहे. प्रवाशांपैकी जे प्रवासी करोना पॉझिटिव्ह असतील त्यांना पुढील उपचारांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. उर्वरित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.


