करोनाबाधितांच्या शोधासाठी आता भिस्त फॅमिली डॉक्टरवर

रत्नागिरी : ग्रामीण भागात पसरत चाललेल्या करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील फॅमिली डॉक्टरांची राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे. देशभरातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्य टास्क फोर्स ग्रामीण भागात सर्वत्र पसरलेल्या फॅमिली डॉक्टरांशी थेट संपर्क साधणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी दोन हजार डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची कल्पना आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील डॉक्टरांशी संवाद साधला गेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे दोन हजार डॉक्टरांशी येत्या आठवड्यात संवाद साधला जाईल. छोट्या-मोठ्या आजारांकरिता ग्रामीण भागातील रुग्ण आपल्या फॅमिली डॉक्टरशी नेहमी संपर्क साधत असतात. डॉक्टरांनाही त्यांच्या परिसरातील रुग्णांविषयीची माहिती असते. हे लक्षात घेऊन त्यांच्यामार्फत करोनाची काळजी घेण्याबाबत प्रयत्न केले, तर करोनाच्या प्रसाराला आळा बसेल.

करोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास झाला होता. दुसऱ्याला लाटेत तीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना त्रास होत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेऊन ग्रामीण भागात डॉक्टरांचे प्रबोधन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांचा आपल्या फॅमिली डॉक्टरवर विश्वास असतो. त्यामुळे सर्व उपचार पद्धतींच्या फॅमिली डॉक्टरांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे, असे श्री. राऊत म्हणाले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून डॉक्टरांना लिंक पाठविली जाणार आहे. प्रत्येक भागातील डॉक्टरांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. ग्रामीण भागातील डॉक्टरांनीही स्वतःहून जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधण्याचे काम पूर्ण होईल. त्या डॉक्टरांचे प्रबोधन झाल्यानंतर करोनाच्या प्रसाराला नक्कीच आळा बसेल, अशी अपेक्षा श्री राऊत यांनी व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply